Pune Metro: कमी पैशात अन् कमी वेळेत प्रवासी पोहोचणार मेट्रो स्थानकात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 13:06 IST2022-03-22T13:05:47+5:302022-03-22T13:06:04+5:30
मेट्रोच्या प्रवाशांना स्थानकापर्यंत घेऊन येण्यासाठी पीएमपीएलची वाहतूक सेवा सोमवारपासून सुरू

Pune Metro: कमी पैशात अन् कमी वेळेत प्रवासी पोहोचणार मेट्रो स्थानकात
पुणे : मेट्रोच्या प्रवाशांना स्थानकापर्यंत घेऊन येण्यासाठी पीएमपीएलची वाहतूक सेवा सोमवारपासून सुरू झाली. या कामासाठी पीएमएपीलशिवाय ‘महामेट्रो’ने आतापर्यंत २४ वेगवेगळ्या संस्थांबरोबर करार केला आहे. त्यातील सायकल, बाईक, रिक्षा या सेवांनाही सुरुवात झाली.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित व पीएमपीएलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच दोन्ही संस्थांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. गरवारे स्थानकाजवळ डॉ. दीक्षित व मिश्रा यांच्या हस्ते पीएमपीएलच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी दरम्यानही पीएमपीएलने ही सेवा दिली आहे. पिंपरी, संत तुकाराम नगर, भोसरी, फुगेवाडी, गरवारे कॉलेज, नळस्टॉप या सहा मेट्रो स्थानकांसाठी वर्तुळाकार मार्गाने पीएमपीएलची सेवा असेल. ५ ते ८ किलोमीटर अंतराच्या या सेवेसाठी ५ ते १० रुपये असे प्रवास शुल्क आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास हे अंतर १० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
याशिवाय ई-सायकल, सायकल, ई-बाईक, ई-ऑटोरिक्षा, ऑटोरिक्षा, कॅब, मिनीबस या ६ सेवांसाठी महामेट्रोने २४ संस्थांबरोबर करार केला आहे. स्थानकात येणाऱ्या व स्थानकापासून जाणाऱ्या मेट्रो प्रवाशांना अल्प दरात या संस्था ही सेवा पुरवतील. पीएमपीएल, मेट्रो तसेच या अन्य प्रवासी सुविधा या सर्वांसाठी शुल्क अदा करताना एकच स्मार्ट कार्ड चालेल अशीही व्यवस्था महामेट्रोच्या वतीने करण्यात येत आहे. पीएमपीएलसह या सर्व प्रवासी सेवांचा वेळ व
मेट्रोचा वेळ यांचा समन्वय साधूनच वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.