पुणेकरांसाठी खुशखबर ...! शहराबाहेरही आता मेट्रो धावणार सुसाट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:57 IST2026-03-07T14:56:33+5:302026-03-07T14:57:12+5:30
- हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली मार्गाला मंजुरी

पुणेकरांसाठी खुशखबर ...! शहराबाहेरही आता मेट्रो धावणार सुसाट...
पुणे :पुणे मेट्रो टप्पा-२ खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली या तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना राज्य सरकारकडून शुक्रवारी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. यामुळे शहरातील मेट्रोमार्गांबरोबर आता शहराबाहेरही मेट्रोचे जाळे विस्तारणार असून, वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांना मेट्रोच्या विस्तारामुळे दिलासा मिळणार आहे.
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण १६ किलोमीटर लांबीच्या असून, त्यामध्ये एकूण १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहेत. या दोन्ही उपमार्गिका पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रोमार्फत करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबरोबरच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे आणखी विस्तारित होणार असून, शहराच्या पूर्व परिसरासह ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे.
तसेच हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते, तसेच मेट्रोचे मल्टिलेव्हल इंटिग्रेशन करून पार्किंग सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे. आता हडपसर बस डेपो ते सासवड रोडपर्यंत राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्याने मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.
--------
रामवाडी ते वाघोली ११ लांबीचे नवे मेट्रो मार्ग :
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये रामवाडी ते वाघोली असा ११ किमी लांबीच्या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे अहिल्यानगर मार्गावरील रामवाडीपासून आता ही मेट्रो वाघोलीपर्यंत जाणार आहे. या नव्या मार्गामुळे नगर रस्त्यावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीतून वाट काढत शहराच्या मध्यभागांत कामानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
-------------
पहिल्या व शेवटच्या मैलाची व्यवस्था :
मेट्रो सेवा ही पर्यावरणपूरक वाहतुकीचा उत्तम पर्याय आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करून, कार्बन उत्सर्जन घटविण्यात मेट्रोची मोठी भूमिका राहणार आहे. याचा थेट फायदा पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेला होणार असून, आरोग्याच्या दृष्टीनेही हा बदल महत्त्वाचा ठरेल. कामगार, विद्यार्थी, आयटी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मेट्रो हा अत्यंत सोयीचा प्रवासाचा पर्याय ठरत आहे. पार्किंगची चिंता, इंधनाचा खर्च, वाहतूक पोलिसांच्या अडचणी यांपासून मुक्तता मिळत आहे. ‘पहिल्या व शेवटच्या मैलाची’ (लास्ट माइल कनेक्टिव्हिटी) व्यवस्था बस, ई-रिक्षा आणि सायकल सुविधांमुळे अधिक सुलभ होत आहे.
--------------
मेट्रोचा दुसरा टप्पा (नवीन मार्गिका)
-खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी (२५.५१ कि.मी., २२ स्थानके)
-नळ स्टॉप ते वारजे माणिकबाग (६.१२ कि.मी., ६ स्थानके)
-हडपसर ते लोणी काळभोर (११.३५ कि.मी., १० स्थानके)
-हडपसर ते सासवड रस्ता (५.५७ कि.मी., ४ स्थानके)
-रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (११.६३ कि.मी., ११ स्थानके)
-वनाज ते चांदणी चौक (१.१२ कि.मी., २ स्थानके)
------------