पिंपरी : माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणाऱ्या पुणेमेट्रो लाइन ३ प्रकल्पाचे काम ८७ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. त्याअनुषंगाने शुकवारी (दि. ४) दुपारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर चार स्थानकापर्यंत पहिली चाचणी घेण्यात आली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतिपथावर आहे. संबंधित प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली असून, या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे. या २३.३ कि.मी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये २३ स्थानके आणि विद्यमान मेट्रो मार्गांसह एकसंध इंटरचेंज असणार आहे. सध्या चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा संच आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन वातानुकूलित डबे असून, एकूण प्रवासी क्षमता अंदाजे एक हजार आहे. या गाड्या ताशी ८० किलोमीटर वेगाने धावणार आहेत. शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर चार स्थानकापर्यंत पहिली चाचणी धाव घेण्यात आली.