Pune Local Body Election: पुणे जिल्ह्यात 'या' सहा कारणांमुळे मिळाले अजित पवार गटाला यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:14 IST2025-12-22T15:12:33+5:302025-12-22T15:14:27+5:30
Pune Local Body Election पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १६१ जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे

Pune Local Body Election: पुणे जिल्ह्यात 'या' सहा कारणांमुळे मिळाले अजित पवार गटाला यश
पुणे : जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळण्याची काही कारणे आहेत. अजित पवारांची जादू नेमकी कशामुळे चालली, याची प्रमुख ६ कारणे आहेत.
पहिले कारण : सत्तेतला सहभाग
जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी भाजप आणि शिंदेसेनेसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यावेळी वादग्रस्त वाटला असला, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तो अत्यंत फायदेशीर ठरला. सत्ता म्हणजे निधी, प्रशासनावर प्रभाव आणि निर्णयक्षमतेचा वेग. नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावर हे घटक महत्त्वाचे ठरले.
दुसरे कारण : प्रचारात मूलभूत प्रश्नांवर फोकस
ग्रामीण आणि निमशहरी भागात आजही रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छता हे मूलभूत प्रश्न केंद्रस्थानी आहेत. याच गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या मूलभूत प्रश्नांना निधी देणारा मीच आहे, हे मतदारांवर बिंबवण्यात अजित पवार यशस्वी झाले.
निधी आणण्याची क्षमता, कामे मंजूर करून घेण्याची हातोटी आणि आक्रमक प्रतिमा, या साऱ्याचा थेट फायदा त्यांना झाला.
तिसरे कारण : स्थानिक पातळीवरील मजबूत संघटन
अजित पवार गटाने स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांना विश्वासात घेतले. अनेक ठिकाणी उमेदवार निवडताना जातीय समीकरणे, स्थानिक प्रभाव आणि प्रत्यक्ष कामाच्या क्षमतांचा विचार केला. परिणामी, केवळ पक्षचिन्हावर नाही, तर उमेदवाराच्या ताकदीवरही विजय मिळवता आला. बारामतीसारख्या बालेकिल्ल्यातही ही रणनीती निर्णायक ठरली.
चौथे कारण : दुबळे विरोधक
या निवडणुकांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सर्वाधिक फटका बसला. संघटनात्मक विस्कळीतपणा, नेतृत्वाचा अभाव आणि बदलत्या राजकीय वास्तवाशी जुळवून न घेण्याची मानसिकता, यामुळे विरोधी पक्ष मागे पडले. लोकसभेत भावनिक पाठिंबा मिळाल्यानंतरही विधानसभा व नगरपरिषद स्तरावर तो टिकवता आला नाही.
पाचवे कारण : स्थानिक नेतृत्वावरील विश्वास
अजित पवारांचे राजकारण हे आदर्शवादापेक्षा व्यवहार्यतेवर आधारित राहिले आहे. त्यांनी स्थानिक नेत्यांना बळ देत त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी एकसंघपणे मैदान मारले.
सहावे कारण : मतदारांची नस ओळखण्यात यश
प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायतीत आपल्या भागात काम होणार का? हा प्रश्न केंद्रस्थानी आहे. अजित पवारांनी मतदारांची ही मानसिकता ओळखून आपली राजकीय दिशा ठरवली आणि त्याचा थेट फायदा त्यांना मिळाला.