विमानतळ बाधित सात गावांत जमीन खरेदी-विक्री एजंटांचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:10 IST2025-04-17T16:08:56+5:302025-04-17T16:10:09+5:30

शेती उत्पन्नावर आधारित शेतकऱ्यांचा विमानतळाला विरोध, मात्र विक्री व्यवहार जोरात : बाधित सात गावांतील आकडेवारी समोर..व्यावसायिक, उद्योजकांकडून मोठी जमीनखरेदी

pune Land buying and selling agents in seven villages affected by the airport | विमानतळ बाधित सात गावांत जमीन खरेदी-विक्री एजंटांचा सुळसुळाट

विमानतळ बाधित सात गावांत जमीन खरेदी-विक्री एजंटांचा सुळसुळाट

सासवड : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावातील गावपुढाऱ्यांना हाताशी धरत जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांनी आपले बस्तान बसवत जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात चालवले आहेत. यामध्ये काही व्यवहार कायदेशीर तर अनेक व्यवहार बेकायदेशीर केले असल्याची माहिती मिळत आहे. सामाजिक भान नसल्याने तरुण पिढी आयत्या पैशाच्या मागे लागल्याचे दिसत आहे. निव्वळ शेती उत्पनावर आधारित शेतकरी कुटुंबाची मात्र यातून फरपट दिसत असल्याने विमानतळास विरोध वाढत आहे.

विमानतळाच्या भूसंपादनाला गती आली असून, भूसंपादनाची प्रक्रिया पुढे जात असतानाच विमानतळ बाधित वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव या गावांतील भूसंपादनासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात अनेक बैठका शेतकऱ्यांसोबत घेत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांकडून मात्र सातत्याने कोणत्याही शेतकऱ्यांनी जमिनी विक्री करू नयेत, असे सांगितले तरी बाधित गावांमध्ये खरेदी खताचा धडाका सुरू आहे. उदाचीवाडी, एखतपूर, कुंभारवळण, खानवडी, पारगाव, मुंजवडी, वनपुरी या सात गावांमध्ये एक जानेवारी ते ३१ मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १५२ दस्त नोंदणी झाल्याची माहिती दस्त नोंदणी कार्यालयातून प्राप्त झाली आहे. सातही गावांतील एकूण दस्तांच्या नोंदणीसाठी ३४ लाख ५६ हजार ७३९ रुपये जमा झाले आहेत. एक कोटी ५३ लाख ५४ हजार ५०० रुपये इतकी रक्कम मुद्रांक शुल्कापोटी जमा झाले आहेत, अशी माहिती पुरंदरचे दुय्यम निबंधक आर. बी. फुलपगारे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे विमानतळ प्रकल्पाला सुरुवातीपासून कडवा विरोध करणाऱ्या पारगावात सर्वांत जास्त म्हणजे ७६ दस्तांची नोंदणी झाली आहे. यामध्ये दस्तांची केवळ संख्या असून, किती एकर क्षेत्राची विक्री झाली, ही माहिती गुलदस्त्यात आहे.

एकीकडे विमानतळ प्रकल्पाला विरोध दाखवायचा आणि दुसरीकडे स्वतःची आर्थिक भरभराट करण्यासाठी दलाली सुरूच ठेवायची, असा दुहेरी गोरख धंदा काही स्वयंघोषित समाजसेवक करीत आहेत, तसेच ज्या व्यक्तींना जमिनी दिल्या आहेत, त्या व्यक्ती पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांतील आहेत. अमराठी व्यक्तींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. गावपुढारीच जमीन विक्रीत दलालीचे काम करीत आहेत. केवळ आपले नाव पुढे येऊ नये म्हणून राजकीय पक्षाच्या नेते अथवा कार्यकर्त्यांना पुढे केले जात आहे. त्यातून व्यवहार पूर्ण होताच ठरलेली टक्केवारी वाटून घेतली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची भनकदेखील लागलेली नसते. केवळ गावपुढाऱ्यांवर विश्वास ठेवून विरोधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. खुद त्यांनीच जमिनीचे कागद केल्याचे अनेक दस्तांमधून दिसून आले आहे. त्यामुळे विमानतळ होईल अथवा न होईल. मात्र, येत्या काही वर्षांत पुरंदरमध्ये परप्रांतीय लोकांची संख्या वाढून स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

अशातच खानवडी येथील एक दस्त दुय्यम निबंधक रवींद्र फुलपगार यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला आहे. दस्त नोंदविताना संबंधित व्यक्तीला ओरिजनल आधार कार्ड मागितले होते. नंतर तो परत आला नाही, यानंतर त्यांनी दिलेल्या कलर आधार कार्डच्या झेरॉक्सची पडताळणी केली असता हे आधार कार्ड वैध नसल्याचे समजले. यानंतर संबंधितांना व्यक्ती बोगस असल्याचे सांगितले व हा दस्त ए.डी.एम. ठेवून रद्द लेखाचा दस्त नोंदविण्यात आला व यासंदर्भात खरेदी घेणाऱ्यांची फसवणूक झाली असल्यास त्यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - रवींद्र फुलपगार, दुय्यम निबंधक, सासवड

विमानतळ प्रकल्प बाधित गावांची १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीतील दस्त संख्या..

गावाचे नाव जानेवारी फेब्रुवारी मार्च एकूण दस्त
उदाचीवाडी— ५ - ५ - ११ - २१
एखतपूर — ५   -   ३ - २ -   १०
कुंभारवळण— ०  -   १ - ९-  १०
खानवडी—   ४  -  ९-  ७ २०
पारगाव—   २४ - ३२- २०- ७६
मुंजवडी—   २-१ - २ ५
वनपुरी —   २ - ४ -४ १०

 

Web Title: pune Land buying and selling agents in seven villages affected by the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.