कात्रज उड्डाणपुलाचे काम डिसेंबर पर्यंत पुर्ण होणार; आमदार योगेश टिळेकरांनी केली उड्डाणपूल कामाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:35 IST2025-03-14T15:34:42+5:302025-03-14T15:35:23+5:30
राजीव गांधी प्राणी संग्रलायाच्या जागेत पिलर उभारुण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेतली.

कात्रज उड्डाणपुलाचे काम डिसेंबर पर्यंत पुर्ण होणार; आमदार योगेश टिळेकरांनी केली उड्डाणपूल कामाची पाहणी
कात्रज - कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम भूसंपादन व वाहतूक नियोजना अभावी रखडले होते. सध्या पिलर वरती गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे. उड्डाणपूल कामाची गती, येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय यासंदर्भात आमदार योगेश टिळेकर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामा संदर्भात चर्चा केली. उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावे अशा सूचना विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.
यावेळी टिळेकर म्हणाले की,कात्रज ते मंतरवाडी रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग ५४८ डीडी घोषित केला. उड्डाणपूल व्हावा यासाठी पाठपुरावा केला.तसेच कात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा ताब्यात न आल्याने राजीव गांधी प्राणी संग्रलायाच्या जागेत पिलर उभारुण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेतली. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक,कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.तसेच २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेतील रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलीस यांना वाहतूक नियोजन व परवानगी बाबत सहकार्य करण्याच्या सूचना पोलीस व पाणी पुरवठा अधिकार्यांना दिल्या आहेत.
यावेळी प्रभाकर कदम,माजी नगरसेविका वृषाली कामठे,माजी सरपंच व्यंकोजी खोपडे,तुषार कदम,विकास फाटे,राजू कदम,संदीप बेलदरे पालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर,राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक,पोलीस उपायुक्त अमोल झेंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख,सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शिल्पा लंबे,पाणी पुरवठा अधिकारी श्रीकांत वायदंडे,कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाणे,उपअभियंता दिलीप पांडकर,शाखा अभियंता शेख उपस्थित होते.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी लक्षवेधी
कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण ८४ मीटरच होणार असून मुख्य रस्ता व सेवा रस्ता अशा ५० मीटरमध्ये बाधित होणाऱ्या जागा मालकांना रोख मोबदला देण्यासाठी सात महिन्यांपूर्वी १४० कोटी राज्यसरकार ने दिले.पालिकेचे मिळून २८० कोटी निधी असताना दिरंगाई का या भूसंपादनासह रस्ता रुंदीकरणाला गती देण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेत लक्षवेधी मांडणार आहे.आवश्यक ३२ जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोबदला देवून ताब्यात घेण्यात येतील. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यास एका वर्षात कात्रज कोंढवा रस्ता पूर्ण होईल अशी माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.
कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या पिलर वर गर्डर टाकण्याचे काम गतीने सुरु आहे.संपूर्ण उड्डाणपुलाचे गर्डर तयार आहेत. उड्डाणपूल उतरण्याच्या ठिकाणची जागा पालिकेने ताब्यात दिल्यास पावसाळ्यापूर्वी भराव टाकण्याचे काम पूर्ण होईल.डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करू. -श्रुती नाईक.कार्यकारी अभियंता.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
कात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा ताब्यात घेतल्या नंतर तात्काळ रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.सदर रस्ता डांबरीकरण ऐवजी कॉक्रीटीकरण करण्यात येणार आहे.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रस्ता कॉक्रीटीकरण काम पूर्ण होईल.त्यानंतर पंधरा दिवसात वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. -अनिरुद्ध पावसकर.मुख्य अभियंता पथ विभाग