महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 17:38 IST2025-10-19T17:36:23+5:302025-10-19T17:38:44+5:30
टेंडर कसे भरायचे हे मुरलीधर मोहोळ यांना चांगले माहिती होते. एवढी मोठी जमीन विकताना केवळ ३ कंपन्यांनीच अर्ज भरले होते. या तिन्ही कंपन्या मुरलीधर मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत असा आरोप शिंदेसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केला.

महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
पुणे - शहरातील जैन बोर्डिंग जमिनीच्या प्रकरणावरून महायुतीत वादाचे खटके उडाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या जमीन घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. त्यात भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उडी घेत मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या जमीन घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्याशिवाय मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मुरलीधर मोहोळ यांचा या प्रकरणात खुलासा पाहिला त्यात ते किती हतबल झालेत हे दिसून येते. महाराष्ट्रातील कुठे काय रेट आहेत हे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. मुरलीधर मोहोळ ज्याप्रकारे विषय मांडतात, भाजपा म्हणून मी बोलत नाही. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. १९५८ मध्ये जैन बोर्डिंगने जमीन खरेदी केली होती. गोरगरिबांची मुले तिथे शिकली पाहिजेत त्यासाठी वसतिगृह बनवण्यात आले होते. मात्र काही ट्रस्टींना हाताशी धरून जमिनीचा जो व्यवहार झाला तो संशयास्पद आहे. निवडणुकीपासून ही जमीन हडपण्याचा प्लॅन सुरू होता. २१ नोव्हेंबर २०२३ ला श्रीराम जोशींनी चॅनलला मुलाखत दिली होती. या जागेचे २३० कोटी मिळू शकतात हे सांगितले. टेंडर काढण्याआधीच १५ टप्प्यात पैसे मिळणार हे सांगितले होते. विशाल गोखले आणि इतरांसोबत मुरलीधर मोहोळ महावीर जयंतीला तिथे कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी तिथल्या जमिनीवर त्यांचा डोळा पडला. १३ डिसेंबर २०२४ ला सर्व संचालकांची बैठक झाली. त्यानंतर तीन दिवसांनी ही जमीन विकायची हा ठराव झाला. मात्र त्याआधीपासून जमिनीचा व्यवहार करायचा हे ठरले होते असं त्यांनी सांगितले.
तसेच १६ डिसेंबरच्या ठरावानंतर जमिनीबाबत टेंडर प्रक्रिया सुरू झाली. त्यात ३ ठेकेदार आले. त्यात लांजेकर, बडेकर आणि तिसरे गोखले आले. तिघांचे अर्ज एकाच ठिकाणी टाईप करण्यात आले. त्यात संबंधित जमिनीची एक किंमत ठरवण्यात आली होती. मात्र लांजेकर, बडेकर या कंपन्यांनी त्या रक्कमेच्या खालची किंमत अर्जात दिली. ही सर्व मिलिभगत होती. या जमिनीसाठी लिलाव किंमत लांजेकर १८० कोटी, बडेकरांनी २०० कोटी तर गोखले यांनी २३० कोटी अशी रक्कम भरली होती. टेंडर कसे भरायचे हे मुरलीधर मोहोळ यांना चांगले माहिती होते. एवढी मोठी जमीन विकताना केवळ ३ कंपन्यांनीच अर्ज भरले होते. या तिन्ही कंपन्या मुरलीधर मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत. मोहोळ केविळवाणा प्रयत्न करत आहेत. जैन मंदिरावर दरोडा टाकण्याचं काम मोहोळ यांनी केले. जे विद्येचे माहेर घर आहे ते लुटारूंचं माहेर घर झालं असा घणाघात रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर केला.
दरम्यान, पुण्याचे खासदार कलमाडी यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांच्या पक्षाने राजीनामा घेतला. कालांतराने न्यायिक प्रक्रियेत ते सुटले पण त्या काळात कलमाडींवर कारवाई करण्याचे धाडस काँग्रेस पक्षाने केले. भाजपानेही या प्रकरणात ईडीची चौकशी करून ट्रस्टी आणि त्यांच्याशी संगनमत करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असून या प्रकरणात ज्यांनी चुकीचे काम केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. जे या प्रकरणात दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीला सामोरे गेले पाहिजे अशी मागणीही रवींद्र धंगेकर यांनी केली.