"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:44 IST2025-08-09T05:43:14+5:302025-08-09T05:44:10+5:30
पुणे पोलिस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात झाले.

"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी"
पुणे : पुणे ही ‘फ्युचर सिटी’ आहे. आयटी, उद्योग आणि शिक्षणासह विविध क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या या शहराची वाढ विचारात घेऊन पुढील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अशा यंत्रणांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी देखील एकत्रित काम करावे लागणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे पोलिस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात झाले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, अर्चना त्यागी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची उपस्थिती होती.
पुणे शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी
पुण्याचा विस्तार होत असताना पोलिस दलातही आधुनिक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. पुणे शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. याशिवाय अतिरिक्त एक हजार पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
यापूर्वी राज्य शासनाने पुण्यासाठी सात पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली होती. ही पोलिस ठाणी आता कार्यान्वित झाली आहेत. एकाच वेळी सात पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ होती.