एसटी विभागातील ६५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:07 IST2025-03-07T18:56:50+5:302025-03-07T19:07:00+5:30
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी लागणार

एसटी विभागातील ६५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार
- अंबादास गवंडी
पुणे : राज्य परिवहन विभागाने २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसविण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार पुणे एसटी विभागातील ६५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. त्यानुसार पुणे आरटीओ विभागात नंबर प्लेट बसविण्यास सुरुवात झाली आहे. पुणे एसटी विभागात १४ आगार असून, यामध्ये ८०० पेक्षा जास्त एसटी बस आहेत. यातील ६५० एसटी बस ह्या २०१९ पूर्वीच्या आहेत. तर १५० बसेस नवीन इलेक्ट्रिक आहेत. नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असल्याने त्यांना बसविण्याची गरज नाही. परंतु जुन्या एसटी बसला बसवावे लागणार आहे.
वाहनधारकांकडून प्रतिसाद वाढला
२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाकडून आदेश काढण्यात आले आहेत. सुरुवातीला वाहनधारकांकडून याला अल्प प्रतिसाद मिळत होता. परंतु आता नंबर प्लेट बसविण्याच्या कामाला गती मिळाली असून, वाहनधारकांची संख्या वाढत आहे.