Pune Grand Tour: पुरंदर-बारामती टप्प्यात कॅमेरून स्कॉट विजेता; ल्यूक मडग्वेचे पिवळ्या जर्सीवर वर्चस्व कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:43 IST2026-01-23T11:41:26+5:302026-01-23T11:43:49+5:30
पुरंदर-बारामती टप्प्यात कॅमेरून स्कॉट विजेता ल्यूक मडग्वेचे पिवळ्या जर्सीवर वर्चस्व कायम

Pune Grand Tour: पुरंदर-बारामती टप्प्यात कॅमेरून स्कॉट विजेता; ल्यूक मडग्वेचे पिवळ्या जर्सीवर वर्चस्व कायम
- उमेश गो. जाधव
पुणे : लांब पल्ल्याचा आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेल्या पुरंदर-बारामती या तिसऱ्या टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाचा कॅमेरून निकोलस स्कॉट याने बाजी मारली. त्याने १३७.७ किलोमीटरचा हा टप्पा ३ तास ४ मिनिटे आणि १३ सेकंदांत पार केला तर क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ल्यूक मडग्वेने ‘यलो जर्सी’वरील वर्चस्व कायम राखले. या टप्प्यात प्रत्येक गावातील लोकांनी रस्त्यावर येत सायकलपटूंना प्रोत्साहन दिले. स्थानिकांच्या प्रेमामुळे भारावलेल्या खेळाडूंनी याचा आवर्जून उल्लेख केल्यावर बारामतीकरांच्या जल्लोषात आणखी भर पडली.
सासवड नगरपरिषदेच्या चंदन टेकडी येथून दुपारी १२:३० वाजता या टप्प्याला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या शर्यतीचा फ्लॅगऑफ केला. यावेळी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष आनंदी जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव संजय शेटे उपस्थित होते.
सायकलपटूंचा जथ्था सासवडच्या पुढे आल्यानंतर बल्गेरिया, ग्रीस, नेदरलॅण्डच्या सायकलपटूंनी काही काळ आघाडी घेतली होती. पण ‘ली निंग स्टार’ संघाने सायकलपटू पहिल्या १० ते १५ जणांच्या जथ्थ्यात कायम होते. बुर्गोस बुर्पेललेट बीएच संघाला क्लेमेंट अलेनो याने चढ असलेल्या भागात आघाडी घेतली होती तर याच संघाच्या जॉर्जिओस बुग्लास याने विशिष्ट अंतर सर्वाधिक वेगात पार केले.
बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या पेन्सिल चौकात अंतिम रेषेजवळ शर्यत अधिक तीव्र झाली. तीन तास खेळाडूंमध्ये जबरदस्त चुरस होती. यामध्ये स्कॉट सर्वात वेगवान ठरला. अंतिम टप्प्यात स्कॉटने वेग वाढवला. यात त्याने स्पेनच्या बुर्गोस बुर्पेललेट बीएच संघाच्या जॉर्जिओस बुग्लासला (३ तास ०४ मिनिटे १३ सेकंद) मागे टाकले. तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. बेल्जियमच्या टार्टेलेटो-आयसोरेक्स संघाचा तिमोथी ड्युपॉन्ट (३ तास ०४ मिनिटे १३ सेकंद) तिसऱ्या स्थानावर राहिला. मलेशियाच्या तेरेंगानू सायकलिंग टीमचा झेब कायफिन चौथ्या क्रमांकावर राहिला. पहिल्या दोन टप्प्यांतील विजेता ल्यूक मडग्वे (३ तास ०४ मिनिटे १३ सेकंद) या वेळी सहाव्या स्थानावर राहिला. मात्र, त्याने ‘बेस्ट स्प्रिंटर’साठीची हिरवी जर्सी मिळवली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकूण क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखून ‘पिवळी जर्सी’ स्वतःकडेच ठेवली. तीन टप्प्यांनंतर ल्यूक एकूण ७ तास ३६ मिनिटे १० सेकंद वेळेसह पहिल्या स्थानावर आहे. थायलंडच्या रुजाई इन्शुरन्स विन्स्पेसच्या कार्टर ॲलन बेटल्सपेक्षा तो केवळ १४ सेकंदांनी पुढे आहे.
--------------------------------
तिसरा टप्पा अनेकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त कठीण होता. सुरुवातीचे दोन चढ आव्हानात्मक होते आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे कठीण जात होते; पण वळणदार रस्त्यांवर सायकल चालवताना मला खूप मजा आली. - कॅमेरून स्कॉट
----------------------------
आज रंगणार शेवटचा टप्पा
आता सर्वांचे लक्ष चौथ्या टप्प्याकडे म्हणजेच ‘पुणे प्राईड लूप’कडे लागले आहे. हा टप्पा ९५ किलोमीटरचा असून, तो पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा आणि आधुनिक भागांमधून जाणार आहे. बालेवाडी ते जे. एम. रोड असा टप्पा असणार आहे. इतर स्पर्धकांमधील सेकंदांचे अंतर पाहता अंतिम टप्पा अत्यंत रोमांचक होणार आहे.
---------------------------------------------
विविध गटांतील विजेते
यलो जर्सी (एकूण विजेता) - ल्यूक मडग्वे
ग्रीन जर्सी (बेस्ट स्प्रिंटर) - ल्यूक मडग्वे (ली निंग स्टार)
पोल्का डॉट जर्सी (किंग ऑफ माउंटेन्स) - क्लेमेंट अलेनो (बुर्गोस बुर्पेललेट बीएच)
ऑरेंज जर्सी (बेस्ट एशियन रायडर) - जंबालजाम्तस सैनबायर (बुर्गोस बुर्पेललेट बीएच)
व्हाइट जर्सी (बेस्ट यंग रायडर )- व्हिएगो टिजसेन (विलरप्लोईग ग्रूट ॲमस्टरडॅम)
ब्लू जर्सी (भारताचा सर्वोत्तम खेळाडू) - हर्षवीर सिंग सेखॉन
गावकऱ्यांचे सायकलपटूंना प्रोत्साहन
पुरंदर-बारामती टप्प्यात सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी गावकऱ्यांनी रस्त्यावर गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, वेगवेगळ्या वेशभूषेत जमलेले विद्यार्थी, सायकलपटू दिसताच टाळ्या, शिट्ट्या वाजवून होणारा जल्लोष अशा वातावरणात ही शर्यत पार पडली. खेळाडूंनीही सासवड येथे चाहत्यांसोबत फोटो घेत जल्लोषात सहभाग घेतला. बारामतीत रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी तुफान गर्दी केली होती.