Pune Ganpati Festival : विसर्जनदिनी सहा लाख पुणेकरांची मेट्रोतून सफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:11 IST2025-09-07T19:32:07+5:302025-09-07T20:11:37+5:30
- गेल्या दहा दिवसांत ३५ लाख जणांचा प्रवास; सव्वापाच कोटी रुपये उत्पन्न

Pune Ganpati Festival : विसर्जनदिनी सहा लाख पुणेकरांची मेट्रोतून सफर
पुणे : विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरातील अनेक रस्ते बंद असतात. त्यामुळे मध्यवर्ती भागात मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मेट्रोतून प्रवासाला प्राधान्य दिले. शनिवारी २४ तासांत ५ लाख ९० हजार ९४४ जणांनी मेट्रोतून प्रवास केला. तर गेल्या दहा दिवसांत ३४ लाख ८८ हजार भाविकांनी मेट्रोतून सफर केली. यातून मेट्रोला ५ कोटी २८ लाख ८६ हजार इतके उत्पन्न मिळाले आहे.
यंदा देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे प्रवाशांचा नवा उच्चांक गाठला. मेट्रोमुळे प्रवासी वाहतूक कोंडीतून मुक्त झाले असून, देखावे पाहणे सोयीचे झाले आहे. तर विसर्जन मिरवणुकी दिवशी सगळ्यात जास्त भाविकांनी मेट्रोचा आनंद घेतला. सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू आहे. त्यामुळे भाविकांना थेट मध्यवर्ती भागात मिरवणूक पाहण्यासाठी जाणे सोयीचे झाले आहे. गेल्यावर्षी गणपती विसर्जनादिवशी उच्चांकी ३ लाख ४६ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता. यंदा ५ लाख ९० हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा २ लाख ४५ हजार प्रवाशांची संख्या वाढली आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना झाला आहे.
‘मंडई’, ‘डेक्कन’वर सर्वात जास्त संख्या :
मध्यवर्ती भागात येण्यासाठी भाविकांना मंडई, डेक्कन मेट्रो स्टेशन सोयीचे असल्याने या दोन स्थानकांवर गर्दी झाली आहे. शनिवारी मंडई स्थानकावरून ६५ हजार ५४२ आणि ‘डेक्कन’ स्थानकावरून ६४ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास केला. मंडई मेट्रो स्टेशन शहराच्या मध्यवस्तीत गणपती पाहण्यासाठी जवळ पडते. त्यामुळे प्रवाशांकडून या मेट्रो स्टेशनचा वापर सर्वाधिक केला जात आहे. त्यादृष्टीने मेट्रो प्रशासनाकडून या स्थानकांत सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी :
दिनांक--प्रवासी संख्या--उत्पन्न
२८/०८/२५--२३६५०५--३९६५९०८
२९/०८/२५--२६०५३२---४३३८८१८
३०/०८/२५--३६८५७६--४६८३८६२
३१/०८/२५--३२१४९४--४१७६५७९
०१/०९/२५--३१२८०३--५४०६५५४
०२/०९/२५--३०२२२५--५०४३५०९
०३/०९/०५--३५८७९८--५९९१४८६
०४/०९/२५--३९७०७१--६६८६३५०
०५//०९/२५--३३९१२४--५६९८१८०
०६/०९/२५--५९०९४४--६८९५६७५
यंदा मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज होता. यामुळे मेट्रोकडून योग्य नियोजन करण्यात आले. गर्दी होणाऱ्या स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात होते. याचा प्रवाशांसह मेट्रो प्रशासनाला फायदा झाला. - चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क) महामेट्रो