Pune Ganpati Festival : मध्य प्रदेश, तेलंगणात डीजेवर बंदी मग महाराष्ट्रालाच काय झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:33 IST2025-09-02T19:33:21+5:302025-09-02T19:33:50+5:30
आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे व राज्यात डीजे व लेसर लाइटवर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने राज्य सरकारकडे केली.

Pune Ganpati Festival : मध्य प्रदेश, तेलंगणात डीजेवर बंदी मग महाराष्ट्रालाच काय झाले?
पुणे : मध्य प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात डीजे व लेसर लाइटसवर बंदी घातली. तेलंगणात हैदराबाद पोलिस आयुक्तांनीही सक्त मनाई केली. राज्यात सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आदेशान्वयेद्वारे बंदी घातली आहे. आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे व राज्यात डीजे व लेसर लाइटवर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने राज्य सरकारकडे केली.
पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांनाही याबाबत पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी मध्य प्रदेश सरकारने बंदी घातलेल्या आदेशाची प्रत दिली आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या पोलिस अधीक्षकांनी बंदी घातलेला आदेश पत्रसोबत जोडला आहे. त्याचबरोबर सोलापुरात नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने सुरू केलेल्या डीजी व लेसर लाइटविरुद्धच्या चळवळीची माहिती देत त्याची दखल घेत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यापुरती बंदी घातली त्या आदेशाचीही प्रत जोडली आहे. कोणत्याही उत्सवात ही बंदी आहे, त्यात कसलाही भेदभाव केलेला नाही, याकडे माने यांनी लक्ष वेधले आहे.
माने यांनी सांगितले की डीजेमुळे काय होते? लेसर लाइटमुळे काय होते? याची सर्व माहिती आता तज्ज्ञांनी दिली आहे. प्रचंड आवाजामुळे हृदयक्रिया बंद पडून मिरवणुकीतच काहींचे निधन झाले. लेसर लाइटमळे अनेकांना डोळ्यांचे विकार होऊन अंधत्व आले. या घटना घडल्यानंतरही राज्य सरकारला जाग आलेली नाही. राज्यात डीजेला, लेसर लाइटना बंदी घालावी. कोणत्याही मिरवणुकीत डीजे व लेसर लाइटचा वापर करता येणार नाही. केला तर संबंधितांना शिक्षेची तसेच मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद करावी, अशी मागणी माने यांनी पत्राद्वारे केली आहे. माने यांनी डीजे व लेसरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात सरकारला त्वरित कृती करण्यास भाग पाडावे असे म्हटले आहे.