पुणे - दोन गणेश मंडळांतील अंतर, मानाच्या गणरायांबरोबर असणारा मोठा लवाजमा, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला खूप वेळ लागायचा. तासन् तास रेंगाळणाऱ्या विसर्जन मिरवणुकीवर दरवर्षी यामुळे टीकादेखील होत असे. ही टीका टाळण्यासाठी पुणे शहर पोलिस दलाकडून यंदा गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मानाच्या गणेश मंडळांसह महत्त्वाच्या गणेश मंडळांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी वारंवार चर्चा करूनच हे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती. अशातच गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पथक सदस्यसंख्येबाबत वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी एका ढोल ताशा पथकात वादक व सहाय्यक मिळून एकूण ६० सदस्यांची मर्यादा घालून दिली आहे. मात्र ढोल ताशा महासंघाने ही अट अमान्य ठरवली असून, परंपरेनुसार किमान १५० ते २०० सदस्यांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर पोलिसांनी जोपर्यंत गणपती मंडळ ठरलेल्या वेळेचे पालन करतील, तोपर्यंत पथकामधील सदस्य संख्येवर सक्ती करणार नाही असे स्पष्ट केले आहे.काही दिवसांपूर्वी सह-पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महासंघ पदाधिकारी व ढोल ताशा पथक प्रमुखांनी सदस्यसंख्येबाबत मांडलेल्या सूचनांना मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्थान मिळालेले नाही, अशी तक्रार महासंघाने केली आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून सर्व पुणे शहरातील ढोल ताशा पथकांत साधारणपणे १५० ते २०० सदस्य सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.महासंघाच्या म्हणण्यानुसार, मिरवणुकीत ढोल व ताशा वाजवणाऱ्या वादकांसोबत सहाय्यक वादक, ध्वजपथक, झांजपथक, टिपरी, लेझीम, ढाल-तलवार यांसारखी पारंपरिक प्रात्यक्षिक पथकेदेखील असतात. त्यामुळे पथकाची सदस्यसंख्या ६० वर मर्यादित ठेवणे ही संस्कृती व परंपरेला आघात करणारी बाब आहे, असा महासंघाचा आरोप आहे.दरम्यान, विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक व व्यवस्थापनाबाबत काही सूचना केल्या आहेत. मिरवणूक समाधान चौकातून सुरू होऊन अलका टॉकीज चौकात समाप्त होईल. वाद्यांची वाहतूक टेम्पोद्वारे करण्यात येणार असून, मिरवणूक संपल्यानंतर वाद्ये केळकर रस्ता किंवा कुमठेकर रस्ता मार्गे परत नेण्यात येतील.
विसर्जन मिरवणुकीसाठी मानाच्या गणपतींसाठी निश्चित केलेला वेळ...
गणपती मंडळ - लोकमान्य टिळक पुतळा, मंडई ते टिळक चौक (अलका टॉकिज चौक) - एकूण वेळ
कसबा गणपती - ०९:३० ते २:४५ - ५ तास १५ मिनिटेतांबडी जोगेश्वरी - ०९:४५ ते ०३:०० - ५ तास १५ मिनिटेगुरुजी तालीम - १०:०० ते ०३:३० - ५ तास ३० मिनिटेतुळशीबाग - १०:१५ ते ०४:०० - ५ तास ४५ मिनिटेकेसरीवाडा - १०:०० ते ०४:०० - ०६:०० तासदगडूशेठ हलवाई - (बेलबाग चौक) १६:०० ते १९:३० - ३ तास ३० मिनिटे
यंदा एक तास अगोदर मिरवणुकीला सुरुवात..
पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा शनिवारी (दि. ६) एक तास अगोदर सुरू होणार असून, मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी काटेकोरपणे पावले उचलली आहेत. त्याला मानाच्या मंडळांसह इतर प्रमुख मंडळांनी सहकार्य करण्याची सहमती दर्शवली आहे. मागील वर्षी सकाळी साडेदहा वाजता सुरू विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. यंदा सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी सर्व गणेश मंडळांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन नियोजन केले आहे. मानाच्या मंडळांसह अन्य मंडळांनी वेळ पाळण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने वेळेत पार बसेल असेही त्यांनी सांगितले.