सिग्नलवरून स्वप्नांच्या दुनियेत; दादांच्या शाळेने उजळल्या दोन चिमुकल्यांचे आयुष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:04 IST2026-03-03T15:04:37+5:302026-03-03T15:04:50+5:30

- सिग्नल ते शाळा : संघर्षातून शिक्षणाकडे' उपक्रमांतर्गत शाळेचा सहावा वर्धापन दिन  

pune from Signal to the world of dreams; Dada's school brightens the lives of two little ones | सिग्नलवरून स्वप्नांच्या दुनियेत; दादांच्या शाळेने उजळल्या दोन चिमुकल्यांचे आयुष्य 

सिग्नलवरून स्वप्नांच्या दुनियेत; दादांच्या शाळेने उजळल्या दोन चिमुकल्यांचे आयुष्य 

पुणे : सिग्नलवर फुलं विकणाऱ्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि आयुष्याची लढाई लहान वयातच सुरू झालेल्या दोन मुली... पण शिक्षणाची आस आणि योग्य हाताची साथ मिळाली, तर अंधार उजेडात बदलतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे आराधना जगताप आणि कार्तिकी हिरामण पवार. 'सिग्नल ते शाळा: संघर्षातून शिक्षणाकडे' या उपक्रमांतर्गत दादांच्या शाळेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त १ ते ४ मार्चदरम्यान बालगंधर्व कलादालन येथे भव्य छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. रस्त्यावर भरलेल्या शाळेचा हा प्रवास पाहताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

आराधना सांगते, "पहिल्यांदा दादा दीदी आले, तेव्हा वाटलं दोन दिवस शिकवतील आणि जातील. बोलायलाही भीती वाटायची. स्टेजवर उभं राहणं तर दूरच." घरातील परिस्थितीही कठीण. आई-वडिलांमध्ये मतभेद; वडील वेगळे राहतात. सातवीपर्यंत सरकारी शाळा, पण आठवीच्या प्रवेशासाठी पैसे नव्हते. "आई म्हणाली, सातवी झाली, आता पुढे कसं करायचं? पण मला शिकायचं होतं, लॉयर व्हायचं आहे," हे बोल आहे १४ वर्षाच्या आराधनाचे. ती सांगते, दादा-दीदींनी केवळ तिला धीर दिला नाही, तर तिचं आणि तिच्या तीन मैत्रिणींचं आठवीचं
रस्त्यावर भरलेल्या शाळेचा हा प्रवास पाहताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

प्रवेशही करून दिलं. एबीसीडीपासून सुरू झालेला प्रवास आज लॅपटॉप, कॉम्प्युटर हाताळण्यापर्यंत पोहोचला आहे. "आता स्टेजवर बोलताना भीती वाटत नाही. उत्तर माहीत असूनही हात वर करायला घाबरणारी मी, आज आत्मविश्वासाने बोलते," आराधना हसत सांगते.
कार्तिकीची कहाणीही तितकीच भावनिक. "सातवी-आठवीत असताना मला एबीसीडीचा 'ए' सुद्धा येत नव्हता. सुरुवातीला वाटलं, हे दोन दिवस शिकवतील आणि जातील. पण दादाचा हा हात सोडण्यासाठी नव्हता, तर धरून ठेवण्यासाठी होता," ती सांगते. झोपडपट्टीतील तुटक्या खोलीत सुरू झालेल्या वर्गात ती भीतभीत बसली. "दीदी म्हणाली, 'भिऊ नको, मी तुझ्या बहिणीसारखी आहे.' तेव्हापासून माझी जर्नी सुरू झाली." पाढे, इंग्रजी, कॉम्प्युटर, एक्सेल शीट सगळं हळूहळू समजायला लागलं. आज ती दहावीत शिकते, प्रदर्शनात भाषण करते आणि इतरांना प्रेरणा देते. याशिवाय उपस्थित मुलींच्या आईनीही दादाचे आभार मानले.

पुण्यातील विविध सिग्नल आणि वस्त्यांमधील ४५० हून अधिक वंचित मुलं-मुली आज दादांच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. अंदाजे १४ हजारांहून अधिक मुलं अजूनही शिक्षणापासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन केवळ फोटो नसून, बदलाची हाक आहे.या उपक्रमाला उपस्थित राहिलेल्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कार्याचे कौतुक करत, "अशा पद्धतीचे काम मन की बातपर्यंत पोहोचवू, तळागाळातील घटकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी खासदार निधीतून मदत करू" असे आश्वासन दिले. तर आयकर विभागाचे अधिकारी नितीन वाघमोडे म्हणाले, "तरुणांनी मिळून केलेलं हे काम प्रशंसनीय आहे. कमी वयात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात मुलांना आणणं ही मोठी गोष्ट आहे. मातृभाषेत शिक्षण दिल्यास परिणाम अधिक चांगला होईल."

Web Title : सिग्नल से सपनों तक: स्कूल ने वंचित लड़कियों का जीवन बदला

Web Summary : 'दादा' के स्कूल की बदौलत सिग्नल पर फूल बेचने वाली दो लड़कियां अब स्कूल में आगे बढ़ रही हैं। इस पहल से 450 से अधिक वंचित बच्चों को लाभ हुआ है, जो शिक्षा और समर्थन की शक्ति को दर्शाता है।

Web Title : From Signals to Dreams: School Transforms Lives of Underprivileged Girls

Web Summary : Two girls, once selling flowers at signals, now thrive in school thanks to 'Dada's School'. Over 450 underprivileged children benefit from this initiative, showcasing the power of education and support in transforming lives and offering a brighter future.