तू कागदपत्रं घेऊन पुण्यात ये.. म्हणत गँगस्टर नीलेश घायवळच्या साथीदाराने केली फसवणुक; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:24 IST2025-10-30T17:13:57+5:302025-10-30T17:24:27+5:30
- मित्राची कागदपत्रे वापरून मिळवले सीमकार्ड, त्यावरून केले आर्थिक व्यवहार

तू कागदपत्रं घेऊन पुण्यात ये.. म्हणत गँगस्टर नीलेश घायवळच्या साथीदाराने केली फसवणुक; गुन्हा दाखल
पुणे : शेतीकामासाठी कर्ज मिळवून देतो, नीलेश घायवळकडून नोकरी देतो, असे सांगून मित्राची कागदपत्रे घेऊन त्यावरून सीमकार्ड मिळवून आर्थिक व्यवहार करणाऱ्या नीलेश घायवळच्या साथीदारावर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमोल दत्ता लाखे (रा. लाखणगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) असे नीलेश घायवळच्या साथीदाराचे नाव आहे. याबाबत सुरेश जालिंदर ढेंगळे (३२, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ एप्रिल २०१९ ते २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ, अमोल लाखे व इतरांवर वारजे पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास करत असताना अमोल लाखे वापरत असलेला मोबाईल क्रमांक सुरेश ढेंगळे याच्या नावावर असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला बोलावून घेत चाैकशी केली. यावेळी त्याने पोलिसांना सांगितले की, २०१३-१४ मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याची अमोल लाखे याच्याशी ओळख झाली. अमोल लाखे याचे गाव व त्याचे आजोळ लाखणगाव असल्याने त्यांच्यात मैत्री झाली. एप्रिल २०१९ मध्ये लाखणगाव येथे अमोल लाखे हा सुरेश याला भेटला. तेव्हा सुरेश याने त्याला शेतीसाठी तसेच इतर व्यवसायासाठी कर्ज काढायचे असल्याचे सांगितले होते. अमोल याने मी तुला शेतीसाठी व इतर व्यवसायासाठी कर्ज काढून देतो. तू कागदपत्रं घेऊन पुण्यात ये, असे सांगितले.
त्यानुसार सुरेश हे सर्व कागदपत्रे घेऊन पुण्यात आले. अमोल लाखे याने वारजे पुलाखाली भेटायला बोलावले. तेथे त्याने सुरेश यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, शेतीच्या उत्पन्नाच्या दाखल्याची कागदपत्रे तसेच पासपोर्ट साईजचे फोटो आणि इतर कागदपत्रे घेतली व मी फोन करून कळवतो, असे सांगितले. पुढे लॉकडाऊन लागल्याने कर्जाचा विषय मागे पडला. अमोल लाखे याने या कागदपत्रांचा गैरवापर करून जिओचे सीमकार्ड घेऊन सुरेश ढेंगळे यांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत.