वानवडी : शहरातील वानवडीत जगताप चौकातील सेक्रेड वर्ल्ड इमारतीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली असून धुराच्या लाटांसह क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी उग्र स्वरूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू झाले. सेक्रेड वर्ल्ड इमारतीमधील सात मजले आगीत भस्मसात होऊन लाखोंचे नुकसान झाले. तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० च्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग लागल्याचे समजताच येथील नागरीकांनी अग्निशमन दलाला कळविले. इमारतीमधील सहव्यवस्थापकसह इतर कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
सकाळी अनोळखी नंबर वरुन इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे फोटो आले. वरच्या बाजूने आग खालच्या बाजूला पसरत असल्याचे पाहून किचन रुम बाहेरील गॅस सिलेंडर त्वरीत सुरक्षित ठिकाणी ठेवले व गॅस लाईन, लाईट बंद केल्या. वरच्या बाजूने हाॅटेलच्या चिमणीला आगीने पेट घेतल्याचे दिसून आले. यात हाॅटेलचे नुकसान झाले. - कार्तिक पै, क्वालिटी रेस्टॉरंट आग लागल्याची वर्दी मिळताच घटनास्थळी दाखल झालो. आगीने रौद्ररूप धारण केलेले होते. प्रसंगावधानाने इमारतीमधील नागरीक बाहेर आले. खालून वर सातव्या मजल्यापर्यंत आग लागली होती. तीन अग्निशमन दलाच्या वाहनांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवता आले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. - समिर शेख, कोंढवा बु. अग्निशमन केंद्र प्रमुख