वानवडीत सेक्रेड वर्ल्ड इमारतीला भीषण आग; सात मजले जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:34 IST2025-03-15T13:32:44+5:302025-03-15T13:34:12+5:30

- घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.  

pune fire news massive fire breaks out at Jagtap Chowk in Wanwadi | वानवडीत सेक्रेड वर्ल्ड इमारतीला भीषण आग; सात मजले जळून खाक

वानवडीत सेक्रेड वर्ल्ड इमारतीला भीषण आग; सात मजले जळून खाक

वानवडी :  शहरातील वानवडीत जगताप चौकातील सेक्रेड वर्ल्ड इमारतीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली असून धुराच्या लाटांसह क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी उग्र स्वरूप धारण केले.  या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू झाले.  सेक्रेड वर्ल्ड इमारतीमधील सात मजले आगीत भस्मसात होऊन लाखोंचे नुकसान झाले. तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० च्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग लागल्याचे समजताच येथील नागरीकांनी अग्निशमन दलाला कळविले. इमारतीमधील सहव्यवस्थापकसह इतर कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. 



आगीची  माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक, खुर्द व बी.टी कवडे रस्ता येथून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, पाण्याचा टँकर व आपत्कालीन वाहन घटनास्थळी दाखल झाले. आगीने भीषण रुप धारण केले होते त्यामुळे इमारतीमधील ४,५, ६ मजल्यावरील रिलायन्स इंडस्ट्रीजचे असलेले ऑफिस व ७ व्या मजल्यावरील मारुती सुझुकी कंपनीचे ऑफिस तसेच ग्राउंड फ्लोअरला असलेल्या क्वाॅलिटी रेस्टॉरंट्स च्या किचन विभागात आग मोठ्या प्रमाणावर लागली होती. अग्निशमन दलातील कोंढवा बुद्रुकचे केंद्र प्रमुख समीर शेख, तांडेल राहुल बांदल, सोपान कांबळे, फायरमन महेश फडतरे, अभिजीत थळकर व अग्निशमन कर्मचाऱ्यांकडून दीड तासात या भिषण आगीवर नियंत्रण मिळवले.

आग इतकी भिषण होती की ऑफिसेस, ऐसी, रेस्टॉरंटमधील किचन भाग, चिमणी, इमारतीला लावलेले फायबर शीट, फसाड ग्लास इतर वस्तू जळुन खाक झाल्या. इंटरनेट केबल जळाल्याने इंटरनेट सेवा ठप्प झाली. या ठिकाणी असलेले ३० ते ४० नागरीक प्रसंगावधानाने बाहेर आल्याने जीवितहानी टळली. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
  
दरम्यान, याआधी देखील याच इमारती मधील तीसऱ्या मजल्यावरील ऐसी ला आग लागल्याचा प्रकार घडला होता. ही आगीची सुरुवात सुद्धा त्याच ठिकाणी झाली असावी असे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग कोणत्या कारणामुळे लागली हे त्या विभागातील तज्ञ व्यक्ती तपास करुन सांगतील असे इमारतीचे व्यवस्थापक बर्जिन यांनी सांगितले.

सकाळी अनोळखी नंबर वरुन इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे फोटो आले. वरच्या बाजूने आग खालच्या बाजूला पसरत असल्याचे पाहून किचन रुम बाहेरील गॅस सिलेंडर त्वरीत सुरक्षित ठिकाणी ठेवले व गॅस लाईन, लाईट बंद केल्या. वरच्या बाजूने हाॅटेलच्या चिमणीला आगीने पेट घेतल्याचे दिसून आले. यात हाॅटेलचे नुकसान झाले. - कार्तिक पै, क्वालिटी रेस्टॉरंट  

आग लागल्याची वर्दी मिळताच घटनास्थळी दाखल झालो. आगीने रौद्ररूप धारण केलेले होते. प्रसंगावधानाने इमारतीमधील नागरीक बाहेर आले. खालून वर सातव्या मजल्यापर्यंत आग लागली होती. तीन अग्निशमन दलाच्या वाहनांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवता आले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. - समिर शेख, कोंढवा बु. अग्निशमन केंद्र प्रमुख

Web Title: pune fire news massive fire breaks out at Jagtap Chowk in Wanwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.