Omicron : पुणेकरांची चिंता वाढली; जिल्ह्यात गुरुवारी १३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 00:02 IST2021-12-24T00:01:28+5:302021-12-24T00:02:37+5:30

राज्यातील ४२ ओमायक्रॉन बाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज.

The Pune district recorded 13 omicron infections on Thursday | Omicron : पुणेकरांची चिंता वाढली; जिल्ह्यात गुरुवारी १३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

सांकेतिक छायाचित्र

पुणे - राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. यातील १३ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील ७, पुणे शहरातील ३ आणि पुणे ग्रामीणमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतून गुरुवारी हे अहवाल प्राप्त झाले. बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असून ६ जणांना सौम्य लक्षणे आहेत. 

राज्यातील २३ रुग्णांपैकी १६ जणांना आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास असून, ७ रुग्ण त्यांच्या संपर्कातील आहेत. यांपैकी ६ प्रवासी मध्यपूर्वेकडील देशांतून, ४ युरोपमधून, २ घाना, २ दक्षिण आफ्रिका तर १ जण सिंगापूर आणि १ जण टांझानिया येथून आलेले आहेत. राज्यातील २३ रुग्णांपैकी १८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही तर, ४ रुग्णांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ओमायक्रॉनचे पिंपरी-चिंचवडमध्ये १९, पुणे ग्रामीणमध्ये १० तर पुणे शहरात ६ रुग्ण आढळून आले आहेत. 

राज्यातील ४२ ओमायक्रॉन बाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज
राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ८८ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ४२ रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यावर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून आतापर्यंत पुणे, मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण १ लाख ५६ हजार ११५ प्रवासी आले आहेत. त्यांपैकी २७ हजार ८१९ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोरोनाबाधित १५६ रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून राज्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ६७० नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १२४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
 

Web Title: The Pune district recorded 13 omicron infections on Thursday