वाहनधारकांची होतेय लूट..!'उच्च सुरक्षा नंबर प्लेट'साठी पैसे भरूनही वेळेवर मिळेना सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:09 IST2025-04-11T15:06:50+5:302025-04-11T15:09:18+5:30

-प्लेट बदलण्यासाठी राज्य सरकारकडून ३० जूनपर्यंत मिळाली मुदत

pune Despite paying for 'high security number plate service was not provided on time | वाहनधारकांची होतेय लूट..!'उच्च सुरक्षा नंबर प्लेट'साठी पैसे भरूनही वेळेवर मिळेना सेवा

वाहनधारकांची होतेय लूट..!'उच्च सुरक्षा नंबर प्लेट'साठी पैसे भरूनही वेळेवर मिळेना सेवा

- अंबादास गवंडी

पुणे :
राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी काही ठिकाणी अव्वाच्या सवा दर आकारले जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांची लूट होत असून, पैसे भरूनही दिलेल्या तारखेनुसार उच्च सुरक्षा पाटी मिळत नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांची दुहेरी फटका बसत आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, ज्या-ज्या कंपनीला काम देण्यात आले आहे, त्यांच्याकडे असलेली यंत्रणा तोकडी ठरत आहे. दुसरीकडे वाहनधारकांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. शिवाय नंबर प्लेट लावण्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या आहेत अडचणी  

ग्रामीण भागात फिटमेंट सेंटर नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते.
दुचाकी वाहनांसाठी केवळ १७०० फिटमेंट सेंटर.
अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढले, परंतु यंत्रणा तोकडी असल्याने वेळेवर नंबर प्लेट मिळेना.
ऑनलाइन अर्ज करताना नागरिकांना अडचणी.

फिटमेंट सेंटर वाढविण्याकडे दुर्लक्ष उच्च सुरक्षा पाटी लावण्याचे काम

मिळालेल्या कंपन्यांना आरटीओकडून फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही सेंटरची संख्या काही वाढत नाही. त्यामुळे नागरिकांना खूप दूरच्या तारखा मिळत आहेत. त्यात आता काही सेंटरकडून अचानक काम बंद केले जात असल्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील परिस्थिती २ अतिशय बिकट असून, त्याकडे परिवहन विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. तसेच काही फिटमेंट चालक आरसी बुक, चेसिस क्रमांकाची कोणतीही पूर्वतपासणी न करता दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सुरक्षा पाटी देण्यात येत आहे. त्यामुळे पाटी हरवली किंवा त्याचा गैरवापर झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांचे हेलपाटे

उच्च सुरक्षा नंबर पाटीबाबत ग्रामीण भागात लुटमार सुरू आहे. सुरक्षा नंबर प्लेटची नोंदणी करण्यापासून ते बसविण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी लूटच सुरू आहे. ग्रामीण भागात अनेक नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती नाही. त्यामुळे अर्ज करण्यासाठी १०० ते २०० रुपये लागत आहेत. ग्रामीण भागात कंपन्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणीच फिटमेंट सेंटर आहेत. त्यासाठी नागरिकांना ६० ते ७० किलोमीटर जावे लागते.

एचएसआरपी बसवण्याचे काम वेगाने सुरू असून, राज्यात एक हजार ७०० फिटमेंट सुरू करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक तालुक्यात फिटमेंट सेंटर सुरू करण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत नंबरप्लेट बसवून घ्यावी.
- विवेक भीमनवार, आयुक्त, परिवहन

Web Title: pune Despite paying for 'high security number plate service was not provided on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.