उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिलाच जनता दरबार; राज्यातील नागरिकांची बारामतीत मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:55 IST2026-02-15T12:55:33+5:302026-02-15T12:55:47+5:30
महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिलाच जनता दरबार; राज्यातील नागरिकांची बारामतीत मोठी गर्दी
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिलाच जनता दरबार शनिवारी (दि. १४) पार पडला. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली.
सुरुवातीला उपमुख्यमंत्री पवार यांची प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, तहसीलदार स्वप्नील रावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अमोल पवार आदी अधिकाऱ्यांसमवेत ‘सहयोग’ निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी पवार यांनी बारामतीशी संबंधित अडचणी, सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच प्रमाणे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःचे दु:ख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत पहिलाच जनता दरबार घेतला.
‘अजितदादां’प्रमाणेच अगोदर सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी प्राधान्य दिल्याचे उपस्थितांनी सांगितले. सुरुवातीला जनता दरबारात प्रथम जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दिव्यांग बांधवांनी ‘अजितदादां’नी दिव्यांगांच्या घरकुलाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणले. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी दिव्यांगांचे प्रश्न ऐकून घेत याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांच्या समस्या व प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच यासंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.
यावेळी राष्ट्रवादी परिवाराच्या सदस्यांशी विविध विषयांबाबत चर्चा करून, पक्षकार्याचा आढावा घेत उपस्थितांच्या भावना जाणून घेतल्या आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच शक्य त्या प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांतील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्यांनी भेट घेतली. यात इंदापूर तालुक्यातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आदींचा समावेश होता.