पुणे : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बाजारात टोपी, छत्री, कूल गॉगल्स, मास्क, सनकोट, महिलांचे स्कार्फ आदींची मागणी वाढत चालली आहे. अडगळीत पडलेल्या छत्र्याही आता दिसू लागल्या आहेत.
एरवी टोपी आणि गॉगल्सचा फॅशनसाठी जास्त वापर केला जात असला तरी उन्हाळा सुरू झाला की, हमखास टोपीची आठवण होतेच. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी टोपी खरेदी केली जाते. सध्या गॉगल्स आणि टोप्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गॉगल्सबरोबरच सनकोट, स्कार्फचा वापरही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या सर्व ग्राहकांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन बाजारात उन्हाळ्यासाठी नवनवीन प्रकार उपलब्ध झाले आहेत.
लहान मुलांच्या टोपीला मागणी वाढताना दिसून येत आहे. वाढत्या तापमानापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी पालक सरसावले आहेत. विविध रंगीबेरंगी, कार्टून्स टोपी, रूमाल छोट्या-मोठ्या आकारात बाजारात उपलब्ध आहेत. पांढऱ्या टोप्या आणि रूमाल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा जोर वाढताना दिसून येत आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी व नोकरदार महिलांसाठी डोक्याबरोबर चेहराही पूर्णपणे झाकला जात असल्याने गॉगल्सबरोबर स्कार्प अत्यावश्यक झाला आहे. उन्हापासून चेहरा सुरक्षित ठेवण्याचा हा सोपा मार्ग आहे.
टर्किश टोपी हा प्रकार घेण्यासाठी ज्येष्ठ लोकांची पसंती दिसून येत आहे. त्यातील नवनवीन प्रकार बाजारात आल्यामुळे त्याकडे अधिक कल दिसून येतो. उन्हाची तीव्रता जाणवू लागली की, सगळ्यात आधी आठवण येते ती गॉगल्सची. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी या दिवसांत गॉगल्स अतिशय आवश्यक असल्याने नवनवीन ट्रेंडी गॉगल्स बाजारात दिसून येत आहेत.
दिवसभरात साधारणत: २०० ते ३०० टोप्यांची विक्री होते. अगदी ८० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत टोपी, गॉगल्सही वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. - विक्रेता