बापरे..! माझ्यासोबत स्कॅम झालाय अन् आपण बदनामीपोटी शांत बसतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:47 IST2026-03-17T16:46:36+5:302026-03-17T16:47:45+5:30
आपण रोज त्या वाचतो, ऐकतो तरीदेखील लोक या फसवणुकीला बळी पडत आहेत.

बापरे..! माझ्यासोबत स्कॅम झालाय अन् आपण बदनामीपोटी शांत बसतो
- योगेश देशपांडे
आजच्या काळात ऑनलाइन फ्रॉड हे काही नवीन नाही. आपल्या अवतीभवती रोजच अशा घटना घडत आहेत. आपण रोज त्या वाचतो, ऐकतो तरीदेखील लोक या फसवणुकीला बळी पडत आहेत. हे तुमच्यासोबतही घडू शकतं. मग हे नक्की काय आणि कसं होतं, हे जरा समजावून घेऊया.
१. डिजिटल अरेस्ट : अचानक तुम्हाला व्हाॅटस्ॲपवर फोन येतो आणि सांगितले जाते की, तुम्ही देशविरोधी काम करीत आहात. तुमच्या बँकेचे डिटेल्स, एटीएम कार्डचे फोटो पाठवले जातात. तुमच्या नावाने १०० कोटींचे व्यवहार झालेले असून केंद्रीय मंत्री, मोठे अधिआरी यांच्या नावाने पत्र पाठवले जाते. तुमच्या जिवाला, परिवाराला धोका आहे. यासाठी आम्ही दिलेल्या अकाउंटमध्ये पैसे पाठवा. वशीकरण केलं जात, मेंटल टाॅर्चर केलं जातं. या सगळ्यांत आपण फसतो. स्वतः १० लाख, २५ लाख, १ कोटी देऊन बसतो. परत मागणी येते, आता द्यायला पैसे नसतात. समोरच्यांनाही हे कळतं आणि अचानक हे सगळं थांबतं, फोन, मेसेज बंद होतात आणि मग कळतं की हे सर्व खोटं आहे.
२. व्हाॅटस्ॲप व्हिडीओ कॉल : अचानक तुम्हाला व्हाॅटस्ॲपवर फोन येतो. तुम्ही फोन घेता, कोणीच बोलत नाही. परत असे तीन-चार वेळा आणि पाच सहा दिवस चालू असत. तुम्ही स्वतःहून फोन करता; पण फोन घेतला जात नाही. अचानक संध्याकाळी त्याच नंबरवरून व्हिडीओ कॉल येतो. तुम्ही तो घेता. एक मुलगी काहीतरी बोलते आणि अचानक कपडे काढून तुमच्यासमोर बसते आणि हातवारे करते. तुम्हांला काही कळण्याआधीच फोन बंद केला जातो.
थोड्या वेळाने तुमच्या नंबरवर ३० सेकंदांचा व्हिडीओ येतो आणि तुम्ही त्यामध्ये एका मुलीबरोबर ऑनलाइन बोलत आहात आणि तिला कपडे काढण्यासाठी सांगत आहात असं जाणवत. ऑडिओ नसतो; पण तुमचा व्हिडीओ, चेहरा दिसतो. आता पुढे काही होण्याआधीच तुम्हांला फोन येतो अन् पैशाची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात येते. तुमच्या फेसबुक अकाउंटचा स्क्रीन शॉट पाठवला जातो आणि तुम्ही मग भीतीपोटी १ लाख, २ लाख किंवा असलेले पैसे बदनामी नको म्हणून देता. काही दिवसांनी फोन येणं बंद होत; पण भीती तशीच राहते.
३. ऑनलाइन ट्रेडिंग आणि भरपूर नफा यात फोनवर बोलणं होत नाही. फोनवर मेसेज येतो आणि त्यामध्ये, शेअर मार्केटच्या अधिक माहितीसाठी जॉइन व्हा, त्यामध्ये व्हाॅटस्ॲप ग्रुपची लिंक असते. पहिले पंधरा दिवस अनेकजण इन्व्हिटेशनने जॉइन होतात. ग्रुप ४०० जणांचा होतो. आधीपासूनच काहीजण ग्रुपमध्ये असतात. पुढील १० दिवस खूप सकारात्मक माहिती ॲडमिन देतो. पुढे ॲडमिन पुस्तक प्रकाशित करणार आहे त्यासाठी तुम्हांला काय वाटते हे विचारले जाते. आपणही इंटरेस्ट दाखवतो. आता ॲडमिन 10X concecpt सांगतो. एक लाख लावल्यास तीन महिन्यात १० लाख होणार. आपल्याला ते आधी खोटं वाटतं; पण ग्रुपवर सगळेजण पैसे पाठवून स्क्रीनशॉट पाठवतात आणि आम्हांला प्रॉफिट झालं हे प्रूफ देतात. नंतर आपला इंटरेस्ट वाढतो आणि आपणही छोटी रक्कम म्हणत ५० हजार गुंतवतो. पण कुठे? तर ॲडमिनने बनवलेल्या शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये; कारण सगळे तेच करत असतात. शेअर खरेदी करून आपला नफा झालेला आपल्याला ॲपमध्ये दिसतो. ५० हजारांचे एक लाख होतात. आता आपली भूक वाढते, समूहामधील सगळेच भरपूर पैसे कमवत आहेत, असे रोज आपण संध्याकाळी वाचतो. मग काय अजून पैसे टाकतो, १० लाख, २५ लाख... असे सेव्हिंग, एफडी मोडून सर्वकाही ट्रेडिंगमध्ये लावतो. २५ लाखांचे ५० लाख झालेले दिसतात. सगळे तेच करतात म्हणून पैसे पाठवताना आपण ॲडमिनने दिलेल्या विविध बँक अकाउंटस्मध्ये पाठवतो. आता आपण खुश असतो; कारण चांगला प्रॉफिट मिळणार असतो. आपण पैसे काढण्यासाठी विनंती करतो आणि मग खरी सुरवात होते. आज, उद्या असे अनेक दिवस जातात. आपल्याला प्रतिसाद मिळणं बंद होत जातं, आपला फोन घेतला जात नाही. पुढे काही दिवसांनी फोन बंद लागतो, ग्रुप शांत झालेला असतो. आपल्याला काहीच कळत नाही.
ओटीपी सांगताच सगळा बॅलन्स गायब
ऑनलाइनसाठी ओटीपी लागतो. आपले आधार कार्ड, पॅन कार्ड कोणालाही सहज उपलब्ध होऊ शकते. ओटीपी मात्र आपल्या फोनवर येतो. तो वेगवेगळी कारणे सांगून मागितला जातो आणि आपण तो दिल्यावर आपलं अकाउंट झिरो केलं जातं; म्हणजे सगळा बॅलन्स काढून घेतला जातो. बऱ्याच वेळा फोन येतो की तुम्हांला लॉटरी लागली आहे किंवा तुमच्या अकाउंटमध्ये शासनाकडून पैसे जमा करायचे आहेत. व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या मोबाइलवर आलेला सहा डिजिट नंबर आम्हांला सांगा; म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. आपण कोड पाठवतो; मग आपला अकाउंट बॅलन्स झिरो झाला, असा एसएमएस आपल्याला बँकेकडून येतो. पुढे आपल्याला आलेल्या नंबरवर आपण संपर्क करतो, फोन बंद असतो आणि पुढे आपल्याला आता काय करायचं काहीच कळत नाही.