पुणे : कर्ज देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाला व्यवसायासाठी कर्ज हवे होते. सायबर चोरट्यांनी त्याला कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्ज मंजुरीसाठी काही पैसे भरावे लागतील, असे म्हणत बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने वेळोवेळी १९ लाख ५७ हजार रुपये संबंधिताच्या खात्यात जमा केले.
त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला कर्ज मिळवून न देता त्याची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करत आहेत.