नसरापूर येथे हिप्नॉटाईज करून महिलेचे अडीच लाखांचे सोने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:45 IST2025-07-25T13:44:55+5:302025-07-25T13:45:45+5:30
दर्शनानंतर मंदिराबाहेर पडताच एक अनोळखी व्यक्ती स्कूटरवर त्यांच्यासमोर आली. त्याने महिलेला हिप्नॉटाईज करत बोलण्यात गुंतवले आणि मंदिराच्या दानपेटीत ९०० रुपये टाकण्यास सांगितले.

नसरापूर येथे हिप्नॉटाईज करून महिलेचे अडीच लाखांचे सोने लुटले
नसरापूर : येथील स्वामी समर्थ नगर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिलेला बोलण्यात गुंतवून लुटारूंनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील अंगठी लुटून पलायन केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नसरापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल शिवाजी रेणुसे (वय ६५, रा. नसरापूर, ता. भोर) असे लुटलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कमल रेणुसे यांचे नसरापूर येथील एस. टी. स्टँड परिसरात हॉटेल आहे. त्या सकाळी हॉटेलकडे जात असताना नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ नगर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या.
दर्शनानंतर मंदिराबाहेर पडताच एक अनोळखी व्यक्ती स्कूटरवर त्यांच्यासमोर आली. त्याने महिलेला हिप्नॉटाईज करत बोलण्यात गुंतवले आणि मंदिराच्या दानपेटीत ९०० रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर, ‘तुम्हाला हॉटेलकडे सोडतो’, असे सांगून त्या लुटारूने कमल रेणुसे यांना स्कूटरवर बसवले आणि बनेश्वर फाट्यावरील काळुबाई मंदिराजवळ नेले. तिथे त्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र अंदाजे किंमत २ लाख रुपये आणि हातातील अंगठी अंदाजे किंमत ४० हजार रुपये असे एकूण २ लाख ४० हजारांचे दागिने लुटले आणि तेथून पलायन केले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, नसरापूर ग्रामपंचायतीने परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजद्वारे या घटनेचा तपास सुरू आहे. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.