वाद वाढला अन् चाकू चालला; पतीच्या हल्ल्यात पत्नी ठार;पतीला विमानतळ पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 19:39 IST2025-07-27T19:38:53+5:302025-07-27T19:39:46+5:30
ममता हिचे पती प्रेम चव्हाण याच्याशी सतत घरगुती कारणांवरून वाद होत होते. त्यामुळे ती माहेरी न जाता मावशीकडे राहत होती.

वाद वाढला अन् चाकू चालला; पतीच्या हल्ल्यात पत्नी ठार;पतीला विमानतळ पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे - शहरातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज (२७ जुलै २०२५) दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खांदवे चाळ, खांदवे नगर या ठिकाणी एका पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिचा जागीच खून केल्याची घटना घडली. ममता प्रेम चव्हाण (वय अंदाजे ३० वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.
अधिकच्या माहितीनुसार, ममता ही काही दिवसांपासून आपल्या मावशी रेशमा रामेश्वर जाधव यांच्याकडे खांदवे नगर येथे राहत होती. ममता हिचे पती प्रेम चव्हाण (रा. सोलापूर) याच्याशी सतत घरगुती कारणांवरून वाद होत होते. त्यामुळे ती माहेरी न जाता मावशीकडे राहत होती.
आज दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास प्रेम चव्हाण हा अचानक तिच्या राहत्या घरी येऊन, तिच्याशी काही वेळ वाद घालून चक्क चाकूने गळ्यावर वार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. या हल्ल्यात ममता चव्हाण हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून काही तासांतच आरोपी पती प्रेम चव्हाण याला शोधून काढले आणि ताब्यात घेतले. सध्या पोलिसांकडून आरोपीकडे चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि कारणांची तपासणी केली जात आहे.