मित्रासोबत कोथरूड परिसरात गप्पा मारत असतांना अचानक...; कोथरूड गोळीबार प्रकरणाची A टू Z स्टोरी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 21:00 IST2025-09-18T20:58:56+5:302025-09-18T21:00:33+5:30

रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांनी दुचाकीला जाण्यास साइड दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीनंतर गोळीबारात एक तरुण जखमी झाला

pune crime while chatting with a friend in the Kothrud area suddenly Read the A to Z story of the Kothrud firing incident | मित्रासोबत कोथरूड परिसरात गप्पा मारत असतांना अचानक...; कोथरूड गोळीबार प्रकरणाची A टू Z स्टोरी वाचा

मित्रासोबत कोथरूड परिसरात गप्पा मारत असतांना अचानक...; कोथरूड गोळीबार प्रकरणाची A टू Z स्टोरी वाचा

पुणे : नाना पेठेत टोळीयुद्धातून आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री कोथरूड भागात एका तरुणावर गाेळीबार करण्यात आल्याची घटना घडली. रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांनी दुचाकीला जाण्यास साइड दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीनंतर गोळीबारात एक तरुण जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोथरूड पोलिस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या मुठेश्वर मित्रमंडळासमोर बुधवारी (दि. १७) रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी हा प्रकार घडला. याप्रकरणातील आरोपींनी त्यानंतर पुढच्या १० मिनिटांत आणखी एका इसमावर जुन्या वादाच्या कारणावरून मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या दोन्ही घटनांप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. गुंड नीलेश घायवळ टोळीतील सराईतांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोळीबारामध्ये प्रकाश मधुकर धुमाळ (३६, रा. थेरगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे, तर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात वैभव तुकाराम साठे (१९, रा. कोथरूड) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघांच्या फिर्यादीवरून मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक व अन्य सहकारी यांच्या विरोधात विविध कलमांसह आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हे मित्रांबरोबर मुठेश्वर मित्रमंडळासमोर रस्त्यावर गप्पा मारत उभे होते. दुचाकीवरून घायवळ टोळीतील गुंड तेथे आले. गाडीला साईड दिली नाही, म्हणून त्यांच्यात वाद झाले. त्यातून त्यांच्यातील मयूर कुंभारे याने त्याच्याकडील पिस्टलमधून गोळीबार केला. ही गोळी प्रकाश धुमाळ याच्या मांडीला लागली. गोळी लागून जखमी झालेले धुमाळ तेथून पळत पाठीमागे असलेल्या घरासमोरील पाण्याच्या टाकीआड लपून बसले. त्यानंतर हे गुंड तेथून पळून गेले. 

 प्रकाश धुमाळ हे खेड-शिवापूर येथे पार्टी करण्यासाठी त्यांच्या मित्रांसह गेले होते. एका मित्राला सोडण्यासाठी ते या परिसरात आले असता गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून गुंड तेथे आले. त्यांच्यातील एकाने धुमाळ यांच्यावर गोळीबार केला. गोळी प्रकाश धुमाळ याच्या मांडीला लागली.  - संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३

Web Title: pune crime while chatting with a friend in the Kothrud area suddenly Read the A to Z story of the Kothrud firing incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.