Vanraj Andekar : आंदेकर टोळीच्या सरदाराने नातवाचाच घेतला बळी; नेमकं काय घडलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 09:49 IST2025-09-09T09:48:15+5:302025-09-09T09:49:11+5:30

सुरुवातीला आंदेकर टोळीची योजना सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दूधभाते यांच्या कुटुंबाचा अंत करण्याची होती

pune crime vanraj Andekar the leader of the Andekar gang killed his grandson | Vanraj Andekar : आंदेकर टोळीच्या सरदाराने नातवाचाच घेतला बळी; नेमकं काय घडलं ?

Vanraj Andekar : आंदेकर टोळीच्या सरदाराने नातवाचाच घेतला बळी; नेमकं काय घडलं ?

पुणे : आंदेकर टोळीच्या दहशतीतून पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. टोळी प्रमुख बंडू आंदेकर याने आपल्या नातवाचाच, गोविंद ऊर्फ आयुष कोमकरचा खून घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या नातवाशी तो लहानपणी खेळत असे, तोच आज कौटुंबिक वाद आणि टोळीयुद्धाचा बळी ठरला. ही हत्या वनराज आंदेकरच्या मृत्यूचा बदला असल्याचे समजते.

पोलिस तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, सुरुवातीला आंदेकर टोळीची योजना सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दूधभाते यांच्या कुटुंबाचा अंत करण्याची होती. यासाठी दत्ता काळे याला पिस्तूल व पैसा देऊन पाठविण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी त्याला वेळेत पकडल्याने ही योजना फसली. अखेर सूडाच्या नादात टोळीने गोविंद कोमकरवर गोळ्या झाडून त्याचा जीव घेतला.

गोविंद कोमकरवर कडक पोलिस बंदोबस्तात सोमवारी (दि. ८) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी वडील गणेश कोमकर वारंवार आक्रोश करत होते. ‘ज्या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नाही, त्याची शिक्षा माझ्या मुलाला दिली. बंडू आंदेकरने विनाकारण माझे नाव ओढले आणि माझ्या लेकराला बळी दिला’, असे ते रडताना म्हणत होते. त्यांच्या या हंबरड्याने उपस्थितांना हेलावून सोडले. कुटुंबाने सुरुवातीला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, पोलिसांनी दोन दिवस समजावल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले. ‘बंडू आंदेकर स्वतःच्या नातवाचाच जीव घेईल, असा कुणीही स्वप्नातही विचार केला नव्हता’, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली असून, इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: pune crime vanraj Andekar the leader of the Andekar gang killed his grandson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.