वनराज आंदेकर प्रकरण : वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला? आंदेकर गँगकडून कोवळ्या ’आयुष’चा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:57 IST2025-09-07T16:54:18+5:302025-09-07T16:57:49+5:30
आंदेकर टोळीचा सदस्य कृष्णा आंदेकर यानेच दत्ता काळे याला आर्थिक मदत करून रेकी करण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात पाठवल्याचेही समोर आलं होतं.

वनराज आंदेकर प्रकरण : वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला? आंदेकर गँगकडून कोवळ्या ’आयुष’चा खून
पुणे - विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत गुंतलेल्या पुणे पोलिसांसमोर गुन्हेगारी टोळक्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. नाना पेठेतील मध्यवर्ती भागात शुक्रवारी रात्री अवघ्या १९ वर्षीय आयुष कोमकर याचा पिस्तूलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. आयुष हा गणेश कोमकर यांचा मुलगा होता. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला होता, त्यात गणेश कोमकर हा प्रमुख आरोपी होता. त्यामुळे आंदेकर गँगने सूड उगवत आयुषचा खून केला, अशी चर्चा सध्या पुण्यात जोर धरत आहे.
दरम्यान, १ सप्टेंबर २०२४ रोजी वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला होता. त्यावरून आंदेकर टोळीतील अनेकांना अटक झाली. मात्र, हा खून आम्ही बदला घेऊनच संपवणार.. अशी चर्चा गुन्हेगारी विश्वात सुरू होती. तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी भारती विद्यापीठ परिसरात रेकी करणाऱ्या दत्ता काळे या तरुणाला अटक केली होती. या चौकशीत आंदेकर टोळी खुनाचा कट रचत असल्याचे उघड झाले होते.
हल्ल्याची घटना
शुक्रवारी रात्री साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान आयुष कोमकर क्लासवरून परतला. तो आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभा असतानाच दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तूलातून सलग गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या आयुषचा जागीच मृत्यू झाला. परिसरात क्षणात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अधिकच्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते यांच्या घराबाहेर रेकी करणाऱ्या दत्ता काळे या तरुणाला अटक केली होती. त्यातून खुनाचा कट समोर आला होता. आंदेकर टोळीचा सदस्य कृष्णा आंदेकर यानेच दत्ता काळे याला आर्थिक मदत करून रेकी करण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात पाठवल्याचेही समोर आलं होतं. पुढे आंदेकर टोळी वनराजच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालं होतं.
सोमनाथ गायकवाडचा मुलगा, बायको आणि अनिकेत दूधभाते याचा भाऊ या टोळीच्या निशान्यावर असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात पुढे आंदेकर टोळीच्या आठ जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आंदेकर टोळीला पिस्तूल पुरवल्याप्रकरणी कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीच्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली होती.. त्यामुळे मोठा कट उघडकीस आल्यामुळे पोलीसही निर्धास्त राहिले. आणि त्यानंतर आंदेकर टोळीने पुन्हा नाना पेठेत खुनाचा बदला खून करून घेतला.
पोलिस तपास आणि पुढील कारवाई
तपासात आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी या कटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही या टोळीला शस्त्र पुरवठा करणाऱ्या टिपू पठाण गँगमधील दोघांना अटक झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आंदेकर गँगचा शोध तीव्र केला आहे.