माळशिरस येथील खून प्रकरणात दोघांना अटक; जेजुरी पोलिसांनी केले आरोपी २४ तासांत जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:45 IST2025-12-16T16:44:51+5:302025-12-16T16:45:36+5:30
- पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील दीपक जगताप याचा एक महिन्यापूर्वी पायल कांबळे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता.

माळशिरस येथील खून प्रकरणात दोघांना अटक; जेजुरी पोलिसांनी केले आरोपी २४ तासांत जेरबंद
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे प्रेयसीच्या पतीला डोक्यात कोयत्याने वार करून खून करून फरार झालेल्या दोघांना जेजुरी पोलिसांची चोवीस तासात जेरबंद केले. आरोपीचे नाव सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस ता पुरंदर, जि. पुणे) असे असून, दुसरा आरोपी विधिसंघर्षित बालक आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील दीपक जगताप याचा एक महिन्यापूर्वी पायल कांबळे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. पायल हिचा पहिला प्रियकर सुशांत मापारी याने दीपक व पायल यांना मोबाइलवर फोन करून मला पायल बरोबर लग्न करायचे होते. तुम्ही दोघांनी लग्न केले तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. दिनांक १३ रोजी सुशांत याने दीपकला पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील रामकाठी शिवारात बोलावून घेतले. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून केला.
यावेळी आरोपीच्या सोबत एक विधिसंघर्षित बालकही उपस्थित होता. खून करून हे दोघेही पळून गेले होते. दिनांक १४ रोजी खुनाची घटना उघडकीस आली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके पाठवली होती. दिनांक १५ रोजी आरोपी यवत परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महेश पाटील, पोलिस हवालदार आण्णा देशमुख, तात्यासाहेब खाडे, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, संदीप भापकर, हेमंत भोंगळे, योगेश चितारे, प्रसाद कोळेकर या पोलिस पथकाने यवत परिसरातील शेतात आरोपी जेरबंद केले. आरोपींनी आपण खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.