तुमच्याकडे जे काही आहे ते दे..; कोंढापुरीत प्रवासी डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:47 IST2025-11-01T19:47:16+5:302025-11-01T19:47:31+5:30
पहाटेच्या सुमारास पाऊस सुरू झाला म्हणून कोंढापुरी येथील एका हॉटेलसमोर कारची काच पुसून रस्त्याच्या कडेला थांबले होते.

तुमच्याकडे जे काही आहे ते दे..; कोंढापुरीत प्रवासी डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले
रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून सहलीसाठी प्रवास करणाऱ्या डॉक्टरांवर पहाटेच्या सुमारास कोयत्याच्या धाकाने मारहाण करून लुटल्याची घटना घडली. त्यामुळे शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुणे नगर महामार्गावरून अहिल्यानगरकडून पुणे दिशेने अहिल्यानगर येथील डॉ. चंद्रसेन चौधरी, डॉ. प्रकाश मरकड, शिवाजी भापकर, सुधीर तांबे आणि राजवीर संधू हे एम.एच.१६ डीएम ६४७८ ही कार घेऊन कोकणात सहलीला जात होते. पहाटेच्या सुमारास पाऊस सुरू झाला म्हणून कोंढापुरी येथील एका हॉटेलसमोर कारची काच पुसून रस्त्याच्या कडेला थांबले होते. अचानक तीन दुचाकीस्वार आले आणि कोयत्याचा धाक दाखवत, डॉ. प्रकाश मरकड यांच्या पोटावर कोयता लावत "तुमच्याकडे जे काही आहे ते दे" असे म्हटले. त्यांनी पाचही जणांना हाताने मारहाण केली आणि त्यांच्याकडून अंगठ्या आणि रोख रक्कम घेतली.
दरम्यान, डॉ. चंद्रसेन चौधरी यांच्या गळ्यावरील चेन काढण्याचा प्रयत्न करताना त्यांनी प्रतिकार केला. त्यावर एका तरुणाने त्याच्या हातातील कोयत्याने डॉ. चौधरी यांच्या हाताच्या दंडावर वार करून त्यांना जखमी केले आणि गळ्यातील चेन हिसकावून घेतली. या लुटफटक्यांत पाचही जणांकडून तब्बल सव्वा तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिने आणि २०,००० रुपये रोख रक्कमही लुटली गेली. यानंतर हे तिघे चोरटे दुचाकीने पळून गेले. या घटनेबाबत डॉ. चंद्रसेन सुब्रह्द चौधरी (वय ४६, रा. एमएसईबी कॉलनी, माणिक नगर, ता. जि. अहिल्यानगर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर हा तपास करीत आहेत.