५७ लाख रुपयांचे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करणारे तीन संशयित कोंढव्यात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:55 IST2025-08-21T13:55:17+5:302025-08-21T13:55:36+5:30
यापूर्वी चित्रपट निर्माता गजाआड : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई

५७ लाख रुपयांचे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करणारे तीन संशयित कोंढव्यात जेरबंद
पिंपरी : खासगी कंपनीच्या खात्यांमधून ५७ लाख रुपये काढून ती रक्कम क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतरित करणाऱ्या तीनजणांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी कोंढवा येथून जेरबंद केले. या गुन्ह्यात यापूर्वी एका चित्रपट निर्मात्यालाही अटक केली आहे.
साहिल अन्वर सय्यद (वय २२), भूपेंद्र अवतार सिंग (३४) आणि सरफराज रफिक सय्यद (२९, सर्व रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. एका खासगी कंपनीत अकाउंटंट असलेला तक्रारदार यू-ट्यूबवर शेअर बाजाराशी संबंधित व्हिडीओ पाहत असताना व्हिडीओच्या खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लिंकवरून त्याचे एका अनोळखी व्यक्तीशी संभाषण सुरू झाले. संशयिताने त्याला गुंतवणुकीशी संबंधित ‘प्रॉफिट टिप्स’ देण्याच्या बहाण्याने ॲबॉट वेल्थ नावाच्या ॲपवर नोंदणी करण्यास सांगितले. त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी तक्रारदाराला या ॲपमध्ये ५.१५ कोटी रुपयांचा नफा दाखवण्यात आला. नफ्याची रक्कम काढण्यासाठी त्याने आतापर्यंत ५७ लाख ७० हजार ६५० रुपये गुंतवणूक रक्कम जमा केली होती.
तक्रारदाराने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शुल्कांबद्दल सांगून टाळाटाळ केली. संशय आल्याने तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. फसवणूक केलेली रक्कम पुण्यातील कोंढवा येथील रहिवासी साहेबलाल सालार मारुफ यांच्या नावावर असलेल्या बँक खात्यात मारुफ रिअल इस्टेट या नावाने हस्तांतरित केल्याचे उघड झाले. या खात्यातून रोख रक्कम काढून पुढे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतरित केल्याचे समोर आले.
बीबीएचा विद्यार्थी, पासपोर्ट एजंटचा समावेश
पोलिस उपनिरीक्षक रोहित डोळस यांच्या पथकाने कोंढवा येथे छापा टाकून तीन संशयितांना अटक केली. संशयित साहिल हा बीबीएचा विद्यार्थी आहे. भूपेंद्र हा पासपोर्ट एजंट आहे आणि सरफराज हा गॅरेज चालवतो. तिन्ही संशयितांनी बँक खात्यातून रोकड काढून ती क्रिप्टो करन्सी यूएसडीटीमध्ये रूपांतरित केली आणि दुसऱ्या नेटवर्कमध्ये हस्तांतरित केली. भूपेंद्र सिंगने रोख व्यवहाराची जबाबदारी घेतली. साहिल आणि सरफराज क्रिप्टो एक्सचेंज प्रक्रियेत सहभागी होते. या प्रकरणात चित्रपट निर्माता शिवम बालकृष्ण संवत्सरकर यांना आधीच अटक केली आहे. आतापर्यंतच्या तपासात संशयितांनी वापरलेल्या बँक खात्यात ११ लाख ९३ हजार २३३ रुपयांची संशयास्पद रक्कम जमा केली. त्या खात्याबाबत पोलिसांकडे सात तक्रारी दाखल केल्या आहेत.