आमच्याशी पंगा घेतोस काय ? धमकी देत पुण्यात तरुणाचे अपहरण करून तिघांनी केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:00 IST2026-03-03T09:59:41+5:302026-03-03T10:00:26+5:30
- मारहाण करताना आरोपींनी "आमच्याशी पंगा घेतोस काय?, आज तुला आणि त्या प्रतीकलाही खल्लास करतो," अशी धमकी दिली.

आमच्याशी पंगा घेतोस काय ? धमकी देत पुण्यात तरुणाचे अपहरण करून तिघांनी केली मारहाण
पुणे : कात्रज-कोंढवा रोड परिसरात जुन्या किरकोळ वादातून २० वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७फेब्रुवारी रोजी सकाळी गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड परिसरात ही घटना घडली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी सार्थक राजाराम पाटील (२०) याला, पार्सल देण्याचा बहाणा करून बोलावले.
सार्थक घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्याची गाडी अडवून जबरदस्तीने आपल्या वाहनावर बसवले आणि त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला पर्वती परिसरातील लक्ष्मीनारायण थिएटरजवळ, मित्र मंडळ चौक येथे नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करताना आरोपींनी "आमच्याशी पंगा घेतोस काय?, आज तुला आणि त्या प्रतीकलाही खल्लास करतो," अशी धमकी दिली.
तसेच सार्थकला त्याचा मित्र प्रतीक पाटील याला फोन करून बोलावण्यासाठी, गाडीचे पेट्रोल संपले आहे असे खोटे सांगण्यास भाग पाडण्यात आले. आरोपींनी प्रतीक पाटील याचा अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि वाहनाची चावी जबरदस्तीने घेतली. या प्रकरणात शाहू पोपट निंबाळकर (१९), सोहम राहुल पारखे (१९) आणि सनी संजय दुसुंगे (२०) यांना अटक केली. आणखी तीन विधीसंघर्षित बालकांचा सहभाग असल्याची माहिती आहे. अटक केलेल्या तिघांविरुद्ध यापूर्वी किरकोळ गुन्ह्यांची नोंद आहे.