Pune Crime: मदतीसाठी आलेल्या 'त्या 'तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा? पुन्हा बुधवार पेठेत पाठवले; पोलिस हवालदार निलंबित
By किरण शिंदे | Updated: February 9, 2026 15:43 IST2026-02-09T15:43:06+5:302026-02-09T15:43:26+5:30
सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती.

Pune Crime: मदतीसाठी आलेल्या 'त्या 'तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा? पुन्हा बुधवार पेठेत पाठवले; पोलिस हवालदार निलंबित
पुणे - पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मदतीसाठी स्वतः पोलिस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलिस कर्मचाऱ्यावर झाला असून संबंधित महिला पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली.
मात्र, मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलिस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नेले. तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे. या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले.
परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली असून, “अत्यंत बेजबाबदारपणे कर्तव्य बजावून शिस्तप्रिय पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली,” असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.