धायरीत तडीपार गुंडाकडून कोयता उगारून दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 18:48 IST2025-12-14T18:48:21+5:302025-12-14T18:48:37+5:30
धायरीतील मारुती मंदिर परिसरात नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजवली.

धायरीत तडीपार गुंडाकडून कोयता उगारून दहशत
पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात तडीपार गुंडाने कोयता उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. गुंडाने कोयता उगारून नागरिकांना धमकावले. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी गुंडाला अटक केली. ओंकार उर्फ बुट्या संतोष सातपुते (२२, रा. पारी कंपनी चौक, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.
याबाबत पोलिस शिपाई प्रथमेश गुरव यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपुते हा सराईत आहे. त्याच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातपुते याला शहर आणि जिल्ह्यातून पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले होते.
आदेशाचा भंग करून तो धायरी भागात आला. शनिवारी (दि. १३) सायंकाळी सातच्या सुमारास त्याने धायरीतील मारुती मंदिर परिसरात नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजवली. सातपुते याने कोयता उगारून नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातपुते याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव पुढील तपास करत आहेत.