Pune Crime : एमपीडीए कारवाईनंतर ५ वर्षे फरार असलेला सुनील बनसोडे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:44 IST2025-11-06T10:40:16+5:302025-11-06T10:44:55+5:30
- गजा मारणेचा लेफ्ट हँड अशी बनसोडेची ओळख

Pune Crime : एमपीडीए कारवाईनंतर ५ वर्षे फरार असलेला सुनील बनसोडे जेरबंद
पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावर रॅली काढण्यात आली होती. रॅलीत सहभागी झालेल्या गजा मारणेच्या गुंडांवर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण पोलिसांनी विविध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी गजा मारणेचा लेफ्ट हँड सुनील नामदेव बनसोडे हा फरार झाला होता. वारजे पोलिसांनी त्याला मंगळवारी (दि. ४) अटक केली. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर १५ फेब्रुवारी २०२१ रोजी गजा मारणे याने रॅली काढली होती. त्यात गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गजा मारणे याने वडगाव मावळ न्यायालयात हजर राहून जामीन मिळवला होता.
याच गुन्ह्यात रुपेश मारणे, सुनील बनसोडे व इतरांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गजा मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली होती. रॅलीमध्ये वापरलेल्या महागड्या गाड्या जप्त केल्या होत्या. यावेळी सुनील नामदेव बनसोडे हा फरार झाला, तो अद्याप पोलिसांना सापडला नव्हता. सुनील नामदेव बनसोडे हा वारजे येथे असल्याची माहिती वारजे पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली.
याबाबत पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, गजानन मारणे याचा लेफ्ट हँड सुनील बनसोडे याच्यावर यापूर्वी ८ ते १० गुन्हे दाखल असल्याने तत्कालीन पोलिस आयुक्तांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला होता. परंतु, तो अद्याप सापडत नव्हता. वारजे पोलिसांना तो वारजे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त संभाजी कदम, एसीपी भाऊसाहेब पटारे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे, पोलिस कर्मचारी गणेश शिंदे, अमित जाधव, योगेश वाघ, बालाजी काटे, निखिल तांगडे, सागर कुंभार, शरद पोळ, सत्यजित लोंढे, अमित शेलार आणि अमोल सुतकर यांच्या पथकाने केली.