बनावट देशी व ‘फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओन्ली’ विदेशी मद्याचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:02 IST2025-12-23T11:01:48+5:302025-12-23T11:02:09+5:30
- ‘एक्साइज’कडून खेड तालुक्यात दोन मोठ्या कारवाया; चार आरोपी अटकेत, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बनावट देशी व ‘फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओन्ली’ विदेशी मद्याचा साठा जप्त
चाकण : जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साइज) धडाकेबाज कारवाई करत बनावट देशी दारू तसेच ‘फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओन्ली’ असलेला विदेशी मद्यसाठा मोठ्या प्रमाणात जप्त केला. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये चार आरोपींना अटक करून १३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे एक्साइजच्या भरारी पथक क्रमांक तीनने खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव हद्दीत चाकण–शिक्रापूर रस्त्यालगतच्या पत्राशेडवर १८ डिसेंबर रोजी छापा टाकला. यात मोबाइलसह ७,४४० बनावट देशी दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी वाहीद साजिद शेख (रा. मेदनकरवाडी, ता. खेड) याला अटक केली. पुढील तपासात पथकाने कुरुळी फाटा व कुरुळी येथील हॉटेलवर छापे टाकून आणखी दारूचा साठा जप्त केला.
यामध्ये दिलीप गोविंद अक्कलवाड व अरविंद कैलास नया या दोघांना अटक केली. या संपूर्ण कारवाईत तीन लाख ७३ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भरारी पथक क्रमांक तीनचे निरीक्षक अतुल पाटील, ए. झेड कांबळे, शरद हांडगर, गिरीश माने, अनिल दांगट यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
किराणा दुकानात छापा -
दुसऱ्या कारवाईत एक्साइजच्या खेड विभागाच्या पथकाने खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील किराणा दुकानावर १९ डिसेंबर रोजी छापा टाकला. दुकानाच्या आडोशाने विक्रीस ठेवलेला ‘फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओन्ली’ असा २६३ विदेशी मद्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी दुकानमालक महादेव माणिकराव पवार (रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) याला अटक केली. चारचाकी वाहनासह या कारवाईत नऊ लाख सहा हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. खेड विभागाचे निरीक्षक राजेंद्र दिवसे, दुय्यम निरीक्षक सागर दिवेकर, प्रज्ञा राणे, जगन्नाथ आजगावकर, शरद भोर, भागवत राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.