Pune Crime: "दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", पोलीस कर्मचाऱ्याच्या पोस्टने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:59 IST2025-12-08T09:56:26+5:302025-12-08T09:59:16+5:30
Pune Crime news: पुण्यात एक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. एका वर्षाच्या मुलीसाठी वाढदिवसाची पोस्ट लिहून कर्मचाऱ्यांना स्वतःचा फोटो स्टेट्सला ठेवला आणि भावपूर्ण श्रद्धांजली म्हणूनही एक पोस्ट केली आहे.

Pune Crime: "दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", पोलीस कर्मचाऱ्याच्या पोस्टने खळबळ
"बाळा, मी पोलीस खात्यात नोकरीला आहे. जिथे वरिष्ठांची मनमानी चालते", अशी भावुक पोस्ट लिहून पुण्यात एक पोलीस कर्मचारी बेलत्ता झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहे. निखिल रणदिव असे बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने मोबाईल बंद करण्यापूर्वी स्वतःचा फोटो स्टेट्सला ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट केली. रणदिव यांच्या प्रकरणामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
पुण्यातील यवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी निखिल रणदिवे हे ५ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली. त्यानंतर पाच पथके तयार करून शोध सुरू करण्यात आला आहे. निखिल रणदिवे यांनी हे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून केल्याचे समोर आले आहे.
रणदिवेंची लेकीसाठी भावुक पोस्ट
पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.
निखिल रणदिवे यांनी व्हॉट्सॲपवर मुलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोखाली त्यांनी लिहिले की, बाळा, आज तुझा पहिला वाढदिवस, खूप चांगल्या प्रकारे साजरा करायचा होता. पण, मी पोलीस खात्यात नोकरी आहे; जिथे वरिष्ठांची मनमानी चालते. दीदी तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा."
रणदिवे यांनी काही वेळाने दुसरा फोटो व्हॉट्सॲप स्टेटसला पोस्ट केला. हा फोटो त्यांचा स्वतःचाच होता. त्याखाली त्यांनी लिहिले होते भावपूर्ण श्रद्धांजली. त्यानंतर रणदिवे यांनी त्यांचा मोबाईल बंद केला. तेव्हापासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कोणते आरोप?
निखिल रणदिवे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, नारायण देखमुख यांनी त्यांना कार्यमुक्त करण्यास नकार दिला. मुलगी आजारी असताना आणि आता मुलीच्या वाढदिवसासाठी त्यांनी सुट्टी मागितली. तीही नाकारण्यात आली. त्यामुळे रणदिवे मानसिक तणावात होते. गेल्या वर्षभरापासून आपल्याला हुकुमशाही पद्धतीने वागणूक मिळत आहे. नेहमीच्या मानसिक छळाला कंटाळून मी हे पाऊल उचलत आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलेले आहे.
निखिल रणदिवे यांच्या पोस्टनंतर पुण्याच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे. रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा आरोप केला आहे. बापूराव दडस हे दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत.
पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली
निखिल रणदिवे यांचे स्टेट्स बघून कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, तो होऊ शकला नाही. त्यांचे भाऊ अक्षय रणदिवे यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.
निखिल रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.