राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले यांच्या घरी दरोडा;१२ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 15:10 IST2025-07-06T15:09:07+5:302025-07-06T15:10:13+5:30
दरोडेखोरांनी सुरुवातीला रमेश चौगुले यांच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश केला आणि कपाटातील ८० हजार रुपयांची रोख रक्कम व सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरले.

राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले यांच्या घरी दरोडा;१२ लाखांचा ऐवज लंपास
आळेफाटा :पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले यांच्या वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील घरी आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी मध्यरात्री दरोडा टाकत सुमारे ११ ते १२ लाखांचा ऐवज लुटला. ही घटना रविवारी (दि. ६) मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. चौगुले गावी नसताना ही घटना घडली.
दरोडेखोरांनी सुरुवातीला रमेश चौगुले यांच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश केला आणि कपाटातील ८० हजार रुपयांची रोख रक्कम व सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरले. त्यानंतर अनंतराव चौगुले यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूचा दरवाजा तोडून त्यांनी तीन ते साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदीचे सामान आणि ७० हजार रुपये रोख असा मोठा ऐवज चोरून नेला.
एकूण मिळून दरोडेखोरांनी ११ ते १२ लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेचा तपास सुरू असून दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पिंपळवंडी, काळवाडी, राजुरी आणि आळेफाटा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असताना पुन्हा एकदा पोलीस ठाण्याच्या जवळच दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.