पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट: खेड इंडस्ट्रियल एरियात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:47 IST2025-03-08T14:46:21+5:302025-03-08T14:47:39+5:30
गेल्या काही महिन्यांत पुणे शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट: खेड इंडस्ट्रियल एरियात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
पुणे - पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला असून, गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. नुकताच खेड औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीच्या गेटसमोर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेत कैलास अनिल तांबे यांच्या डोक्याला गंभीर मार बसला असून जबडा फ्रॅक्चर झाला आहे. अजित अनिल तांबे आणि इतर काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कंत्राटावरून वाद सुरु झाला, त्यानंतर दोन गट आमनेसामने
ही घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली. फिर्यादी व त्यांचे सहकारी हुंडाई कंपनीच्या गेटवर असताना आरोपी दुर्गेश गाडे, अभिजित उर्फ बड्या बोहाडे, शुभम मोदगेकर, आकाश पाचाण, ऋषिकेश पवार आणि त्यांचे साथीदार यांनी लोखंडी रॉड व लाठ्यांनी हल्ला केला. कैलास तांबे यांच्या वाहनांचा कंपनीशी करार आहे, तर त्यांचे भाऊ अजित तांबे कंपनीत पाण्याचे जार पुरवतात. २८ फेब्रुवारीला अजित तांबे पाण्याचे जार पुरवण्यासाठी गेले असताना, अचानक १२-१३ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी “तुम्ही खाली काम मागायला येऊ नका, अन्यथा ठार मारू” अशी धमकी दिली.
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट सुरूच असून आता खेड इंडस्ट्रियल एरियात दोन गटांमध्ये तुफान हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. #Lokmatnews#pune#crime#viralvideo#marathinewspic.twitter.com/kMhDqHt340
— Lokmat (@lokmat) March 8, 2025
BNS 2023 अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
खेड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 118(1), 118(2), 189(2), 190, 191(1), 191(2), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुण्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच..!
गेल्या काही महिन्यांत पुणे शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औद्योगिक क्षेत्र, बिल्डर लॉबी, कंत्राटी वाद, टोळी युद्ध यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या कैलास तांबे यांच्यावर गंभीर उपचार सुरू आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत, मात्र अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का?
पुण्यात सातत्याने गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासन व पोलीस विभागाने अशा टोळीधारकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुणे जिल्हा गुन्हेगारीचा अड्डा बनण्याची भीती व्यक्त होत आहे. एका कंपनीच्या कंत्राटावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी होण्याच्या घटनांमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज
खेड औद्योगिक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. औद्योगिक कंपन्यांच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवली जावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून, पोलिसांनी या गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.