पुणे : शहरात दररोज घरफोडीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. शुक्रवारी देखील विविध चार पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडीच्या ४ घटनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ३ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. पहिल्या घटनेत, सहकारनगर नं. २ येथील ५८ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार २६ जून रोजी संध्याकाळी ६ ते २७ जून सकाळी सात या दरम्यान चोराने त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला. घरात प्रवेश करून चोराने ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. पुढील तपास सहायक पोलिस फौजदार खुटवड करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, राकेशकुमार जगरनाथराम कुमार (३५, रा. अथर्व बिल्डिंग, मराठा कॉलनी, संत नगर, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २१ ते २२ जूनच्या दरम्यान त्यांच्या घराच्या लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा, कुलूप तोडून चोरांनी बेडरूममधील पेटीचे लॉक तोडून २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. पुढील
तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, यशवंत काळे (५७, रा. खोली नं. २, एरिगेशन कॉलनी, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २४ ते २७ जून दरम्यान चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून, हॉलमधील लाकडी कपाटाच्या आतील लॉकर उघडून ४६ हजार
रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नंदनवार करत आहेत.
चौथ्या घटनेत, राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, मोहम्मद वाडी येथील ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली
आहे. त्यानुसार, २६ जून रोजी चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ५ हजार रुपये किमतीचे २ भरलेले सिलिंडर आणि ५ हजार रोख असा १० हजारांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटोळे करत आहेत.
शहरातील घरफोड्या दृष्टिक्षेपात
वर्ष - दाखल घरफोड्यांचे गुन्हे - उघडकीस आलेले गुन्हे
२०२३ - ६१० - ३४२
२०२४ - ५०७ - १६८
२०२५ (जून) - २६९ - ५९