१४ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:57 IST2025-08-13T18:56:39+5:302025-08-13T18:57:07+5:30
आशिष अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.

१४ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
धायरी - सिंहगड रस्ता परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी एका सराईत घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून १४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (वय २४, सध्या रा. राधानगरी सोसायटी, दिघी रस्ता, भोसरी; मूळगाव – मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे आहे.
अधिकच्या माहितीनुसार, २० मे २०२५ रोजी आनंदनगर येथील आशिष अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात काळ्या रंगाचे जॅकेट व हेल्मेट घातलेला एक व्यक्ती रात्री २ ते ५ दरम्यान घरफोडी करताना दिसला. तपास सुरू असताना ८ ऑगस्ट २०२५ रोजी अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर आणि निलेश भोरडे यांना या घटनेबाबत माहिती मिळाली की, संशयित आरोपी दिघी रस्त्यावरील राधानगरी सोसायटीत थांबला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पुणे शहर व सिंहगड रस्ता परिसरात गेल्या ६-७ महिन्यांत अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली.
दरम्यान, आरोपीकडून ५,७१,१५० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले तर ६ लाख ७० हजार रुपये किमतीची ह्युंदाई ‘व्हेन्यू’ कार आणि १ लाख ८२ हजार रुपये किमतीचे कार ॲक्सेसरीज व दुरुस्ती साहित्य सापडले आहे, पल्सर मोटारसायकल, बोल्ट कटर, हातोडी, स्क्रू ड्रायव्हर, मास्क आणि हॅन्डग्लोव्ह्ज जप्त केले आहे.
पोलिसांनी केले दीड महिने अथक प्रयत्न
आरोपीची ओळख पटविण्यासाठी असंख्य सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी गोळा केले. आरोपी हा फक्त गुरुवारी, शनिवारी व रविवारीच चोरी करायचा. पोलिसांनी त्याने केलेल्या अनेक गुन्ह्यांची माहिती एकत्र केली. आरोपी गुन्ह्याच्या वेळी मोबाईल वापरत नसल्याने पोलिसांना तपासात अडचण येत होती. अखेर पोलिसांनी त्याला शोधून काढले. आरोपीने त्याच्या पत्नीला मी लोडिंग - अनलोडिंगची कामे करतो असे सांगितले होते. त्याच्या पत्नीला देखील हा चोरी करतो, हे माहीत नव्हते. त्याच्यावर पुणे, पुणे ग्रामीण, कोल्हापूर आणि नवी मुंबई येथे यापूर्वीच १७ घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच, तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यातही यशस्वी झाला होता, त्यामुळे त्याच्यावर पळून जाण्याचा गुन्हाही यापूर्वी दाखल आहे.
नागरिकांसाठी आवाहन
सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू घरात ठेवण्याऐवजी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी. तसेच, आपल्या सोसायटी, बंगला किंवा कॉम्प्लेक्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे आवाहन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी केले आहे.