३२ गुन्ह्यांतील पावणे दोन कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा पोलिसांनी केला नाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:41 IST2025-10-31T18:40:51+5:302025-10-31T18:41:35+5:30
- २८४ किलो अंमली पदार्थांमध्ये २१७ किलो गांजा

३२ गुन्ह्यांतील पावणे दोन कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा पोलिसांनी केला नाश
पुणे : शहर पोलिस आयुक्तालयातील ३२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १ कोटी ७५ लाख ६ हजार ५८० रुपयांचा २८४ किलो अंमली पदार्थ पोलिसांनी नष्ट केला. रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीमध्ये या सर्व अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील मुुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, राजलक्ष्मी शिवणकर, सहायक रासायनिक विश्लेषक अ. अ. कामठे, वैज्ञानिक आर. आर. पाटील, प्र. म. येलपुरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय खामकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर, दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्तालयातील ५ पोलिस ठाण्यांतील अंमली पदार्थ त्यामध्ये गांजा, एमडी, कोकेन, हेरॉईन, एमडीएमए, अफूची झाडे, मेथाम्फेटामाईन, बंटा गोळी, इडुलिस खत, चरस असे एकूण २८४ किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
त्यात लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील २२ गुन्हे, खडक ६, डेक्कन २ आणि फरासखाना व कोथरुडमधील प्रत्येकी एक अशा ३२ गुन्ह्यांमधील जप्त अंमली पदार्थ होता. त्यात सर्वाधिक ४३ लाख ५५ हजार ७६० रुपयांचा २१७ किलो गांजा, ५४ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा ४ किलो ५३९ ग्रॅम चरस यांचा प्रामुख्याने समावेश होता.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, दत्ताराम जाधव, नितीन जाधव, नागेश राख, दयानंद तेलंगे, संदीप शिर्के, सुहास डोंगरे, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, रेहाना शेख, सूर्यवंशी, रवी रोकडे, चेतन गायकवाड, कांबळे, मांढरे, जगदाळे, अक्षय शिर्के, दिनेश बास्टीवाड, सुहास तांबेकर, शेलार यांनी केली.