रात्री दहशत,पोलिसांनी सकाळी काढली धिंड; येरवडा पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 20:56 IST2025-08-12T20:55:55+5:302025-08-12T20:56:40+5:30
हा व्हिडीओ पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यातील दोघांना अटक केली

रात्री दहशत,पोलिसांनी सकाळी काढली धिंड; येरवडा पोलिसांनी केली कारवाई
पुणे : येरवड्यातील गणेशनगर भागात कोयते उगारून आणि नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजविणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक करून त्यांची दहशत माजवलेल्या परिसरात बुरखा घालून धिंड काढली.
शैलेश राजू मोहिते (१९) आणि रितेश संतोष खुडे (१९, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी पोलिसांनी धिंड काढलेल्यांची नावे आहेत. शैलेश मोहिते, रितेश खुडे व त्यांच्या इतर ५ अल्पवयीन साथीदारांनी ५ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास येरवड्यातील गणेश नगर परिसरात नागरिकांना शिवीगाळ करून कोयते उगारले. तसेच घराच्या दरवाजावर कोयते आपटून दहशत निर्माण केली होती. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडीओ पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यातील दोघांना अटक केली.
इतर ५ जणांना बाल न्यायालयात हजर केले. दरम्यान, ज्या गणेशनगर भागात कोयते फिरवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्याच भागात या पोलिसांनी मोहिते व खुडे याची बुरखा घालून धिंड काढली. यावेळी पोलिसांनी लोकांनी निर्भय होऊन गुंडगिरीला थारा न देता पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले.