Pune Crime:महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील दोघांना पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:19 IST2025-09-09T13:19:13+5:302025-09-09T13:19:24+5:30
आज महिला पत्रकार विनयभंग प्रकरणी दोन आरोपी निष्पन्न करून फरासखाना पोलिसांकडून अटक केली आहे.

Pune Crime:महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील दोघांना पोलिसांकडून अटक
पुणे : विसर्जन सोहळ्यात वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन करून तिच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्रिताल ढोल-ताशा पथकातील दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर आज मंगळवार (दि. ९) महिला पत्रकार विनयभंग प्रकरणी दोन आरोपी निष्पन्न करून फरासखाना पोलिसांकडून अटक केली आहे.
दरम्यान ही घटना बेलबाग चौकात घडली होती. याबाबत एका महिला पत्रकाराने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वादकांवर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार महिला पत्रकार विसर्जन सोहळ्यात शनिवारी (दि. ६) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास वार्तांकन करत होती.
त्यावेळी त्रिताल ढोलताशा पथकातील एका वादकाने लोखंडी ट्राॅली ओढत आणली. पायावरून चाक गेल्याने महिला पत्रकाराने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा वादकाने महिला पत्रकाराशी वाद घालून धक्काबुक्की केली. तिच्याबरोबर अश्लील वर्तन केले. महिला पत्रकाराबरोबर असलेल्या सहकाऱ्याने वादकाला जाब विचारला. तेव्हा वादक आणि त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याने त्याला धक्काबुक्की केली. मारहाणीत त्यांचा चष्मा तुटला. ढोल पथकातील वादकांनी दोघांनी शिवीगाळ केली. त्यानंतर महिला पत्रकाराने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या प्रकरणी ढोल-ताशा पथकातील दोन वादकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत.