राजगुरूनगर: हॉटेलचा चांगला धंदा होतोय आम्हाला हप्ता चालु कर' असे म्हणत हॉटेल चालकावर एकाने गावठी पिस्तुलातून दोनदा फायर केले. नेम चुकवला म्हणुन दुर्घटना टळली. मात्र टोळक्याकडून लाथा, बुक्यांनी हॉटेल मालकाला बेदम मारहाण केली.तसेच हॉटेल समोर असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
गोसासी , ता. खेड येथे रविवारी (दि ११) मध्यरात्री झालेल्या या प्रकरणी खेड पोलिसांनी ९ जणांविरोधात खंडणी, बेकायदा जमाव जमा करून दहशत, मारहाण तसेच बेकायदा शस्त्र बाळगुन जीवितास धोका पोहचवण्याच्या हेतुने गोळीबारा प्रकरणी ९ युवकांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती खेड पोलिसांनी दिली. मयुर तानाजी हजारे, अक्षय बबन हजारे, मंगेश दौंडकर (तिघे रा. कन्हेरसर, ता. खेड ) गणेश दिलीप गोरडे (रा.गोसासी, ता. खेड ),बंटी डफळ (रा.धामारी, ता. शिरूर ) यांसह इतर चार अनोळखी युवकांचा त्यात समावेश आहे.
हॉटेल चालक निलेश रोहिदास गोरडे याने पोलीसात तक्रार नोंदवली आहे. शनिवारी (दि १०) सबंधित हॉटेलमध्ये आरोपींनी जेवण केले.बिलाचे पैसे मागितल्यावर अक्षय हजारे याने कमरेचा पट्टा काढून मालक निलेश याला मारण्याची धमकी दिली. हा वाद मिटल्यावर काही वेळाने म्हणजे हॉटेल बंद झाल्यावर रात्री बारा वाजता हे टोळके पुन्हा हॉटेल समोर आले. त्यांनी हॉटेल चालक आणि त्यांच्या भावांना शिवीगाळ केली.शिवीगाळ, दमदाटी करून त्यातील मयुर हजारे व अक्षय हजारे हे भाऊ संदेश याला ' तुझे हॉटेलचा धंदा चांगला होतो. तु आम्हाला हप्ता चालु कर. नाहीतर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही. ' असे म्हणुन खंडणीची मागणी केली . त्याला भाऊ संदेश गोरडे याने नकार दिला असता चिडुन जावुन मयुर हजारे याने त्याचे हातातील पिस्तुल संदेश गोरडे याचेकडे रोखुन त्यास जिवे ठार मारण्यासाठी पिस्तुलमधुन दोनवेळा फायर केला. परंतु संदेश याने ते फायर चुकवली. त्यानंतर या टोळक्याने हॉटेलच्या पार्किंगमध्ये संदेश गोरडे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर या सर्वांनी दगड, लाकडी दांडके, पार्किंग मधील कुंड्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये असलेल्या चारचाकी व दुचाकी गाड्यांच्या काचा तसेच हॉटेलच्या काचा, फ्लेक्स बोर्ड फोडुन त्यांचे नुकसान केले. घटना घडल्यानंतर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
कनेरसर , गोसासी, निमगाव या परिसरात सेझमध्ये कारखानदारी क्षेत्र वाढले आहे.कंपनी क्षेत्रात यापूर्वीही टोळक्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दहशत निर्माण केली आहे. कंपनीत काम मिळावे यासाठी, स्क्रॅप उचलण्यासाठी येथे खून, मारामाऱ्या प्रकरण समोर येत आहेत. रोज होणाऱ्या दादागिरी, दहशतीच्या घटना रोखण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे. कारखानदारी वाढत असलेल्या या भागात कायमस्वरुपी पोलिस चौकी सुरू करावी अशी मागणी होत आहे.