जुन्या वादातून चुलत्यासह चुलतभावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 09:43 IST2025-09-13T09:43:09+5:302025-09-13T09:43:20+5:30
बारामती तालुका पोलिसांनी याप्रकरणी चुलता रामदास जगन्नाथ इंगळे व त्याचा मुलगा प्रमोद रामदास इंगळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जुन्या वादातून चुलत्यासह चुलतभावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
बारामती : मागील वादाच्या कारणावरून चुलत्याने व त्याच्या मुलाने युवकाला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. सौरभ विष्णू इंगळे (वय २५, रा. इंगळे वस्ती, पारवडी, ता. बारामती) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. बारामती तालुका पोलिसांनी याप्रकरणी चुलता रामदास जगन्नाथ इंगळे व त्याचा मुलगा प्रमोद रामदास इंगळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. १०) रोजी रात्री पावणेअकरा वाजता इंगळे वस्ती, पारवडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात सौरभ याची आई सुनीता विष्णू इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. सौरभ व प्रमोद यांच्यात जुन्या वादाच्या कारणावरून बोलणे चालू असताना रामदास इंगळे याने सौरभ याला शिवीगाळ केली. सौरभ व प्रमोद यांच्यात मारहाण सुरू झाली. त्या वेळी रामदास इंगळे हा सौरभ याला पाठीमागून पकडून आता याला सोडू नको, मार याला असे प्रमोदला म्हणाला. त्या वेळी प्रमोदने त्याच्याजवळील टोकदार हत्यार काढून सौरभ याच्या गळ्याच्या खाली उजव्या बाजूला मारले. त्यात सौरभ जखमी झाला.
सौरभला त्याचा मामा संतोष उत्तम गाडेकर यांनी उपचारासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर फिर्यादी सौरभच्या पत्नीसह रुग्णालयात आली. सौरभ हा रक्ताने माखलेला होता. त्याच्या गळ्याखाली टोकदार हत्याराने मारून जखमा केल्याचे दिसत होते. उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे तेथील डाॅक्टरांनी घोषित केले. दरम्यान, या भांडणानंतर रामदास व प्रमोद इंगळे हे बाप-लेक सौरभ विरोधात तक्रार देण्यासाठी बारामती तालुका पोलिस ठाण्यात आले होते. पोलिस त्यांची तक्रार घेत असतानाच सौरभ याचा मारहाणीत व वार केल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.