Pune Crime: “तू खूप सुंदर दिसतेस…” म्हणत डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यात धक्कादायक घटना
By किरण शिंदे | Updated: March 7, 2026 12:22 IST2026-03-07T12:18:21+5:302026-03-07T12:22:23+5:30
- या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Pune Crime: “तू खूप सुंदर दिसतेस…” म्हणत डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यात धक्कादायक घटना
पुणे - पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एका तरुणीचा डिलिव्हरी बॉयकडून विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोर्टर ॲपवरून सामान आणण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या हाताला स्पर्श करत तिला “तू खूप सुंदर दिसतेस” असे म्हणत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोर्टर ॲपवरून काही सामान मागवले होते. ६ मार्च रोजी सायंकाळी साधारण पाचच्या सुमारास डिलिव्हरी बॉय सामान घेऊन तिच्या घरी आला. तरुणीने दरवाजा उघडून त्याच्याकडून पार्सल घेतले. पार्सल दिल्यानंतर डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पिण्याचे पाणी मागितले. तरुणीने त्याला पाणी दिले. मात्र त्यावेळी डिलिव्हरी बॉयने तिच्या हाताला स्पर्श करत “तू खूप सुंदर दिसतेस” असे म्हणत गैरवर्तन केले. या प्रकारामुळे तरुणी घाबरली आणि अस्वस्थ झाली.
या घटनेच्या वेळी घरात तरुणीचे बाळ आणि सासू उपस्थित होते. घडलेला प्रकार तिने तात्काळ आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तरुणीने ॲपमधील सर्व माहिती आणि डिलिव्हरीची तपशीलवार माहिती पोलिसांना दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी श्रीधर कांबळे या डिलिव्हरी बॉयविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून शिवाजीनगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.