Pune Crime : भाडं थकलंय; चोरी करूया…! तिने बॉयफ्रेंडसाठी रचला जबरी चोरीचा कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:57 IST2026-01-11T12:56:55+5:302026-01-11T12:57:44+5:30
बॉयफ्रेंडचे थकलेले घरभाडे भरण्यासाठी अल्पवयीन पुतणीचा कट; येरवडा पोलिसांकडून २४ तासांत तिघे जेरबंद

Pune Crime : भाडं थकलंय; चोरी करूया…! तिने बॉयफ्रेंडसाठी रचला जबरी चोरीचा कट
पुणे : कल्याणीनगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये हत्यारांसह शिरून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. या प्रकरणात फिर्यादीच्या घरातील अल्पवयीन पुतणीनेच बॉयफ्रेंडचे थकलेले घरभाडे भरण्यासाठी जबरी चोरीचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यश मोहन कुऱ्हाडे (२०, रा. केसनंद), रुषभ प्रदीप सिंग (२१, रा. चर्होली) आणि प्राज विवेक भैरामडगीकर (१८, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत कल्याणीनगर येथील एका महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास घडली होती.
फिर्यादी घरी असताना तोंडावर मास्क व हुडी घातलेले दोन तरुण घरात शिरले. त्यांच्या हातात सुरी, टेप व सुतळी दिसल्याने फिर्यादीने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी जबरदस्तीने घरात घुसले. घाबरून फिर्यादी बेडरूममध्ये जाऊन आरडाओरड करू लागल्या. शेजारी जमा होताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यातून तिघे संशयित स्पष्ट दिसून आले. दरम्यान, घरातील अल्पवयीन पुतणी संशयास्पदरीत्या निघून जात असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी चौकशी केली. तिच्या बॉयफ्रेंडचे भाडे थकल्याने त्याच्यासह मित्रांच्या मदतीने जबरी चोरीचा कट रचल्याचे उघड झाले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिसांनी केली.