तू माझ्या लेकीला का मारतोस ? प्रश्न विचारल्यामुळे जावयाने सासऱ्याला केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:36 IST2025-07-25T18:34:30+5:302025-07-25T18:36:04+5:30
घरात कौटुंबिक चर्चा सुरू असताना सासऱ्याने जावयाला, “तू माझ्या मुलीला का मारहाण करतोस?” असा जाब विचारला. यावरून सचिन घोरपडे याचा राग अनावर झाला.

तू माझ्या लेकीला का मारतोस ? प्रश्न विचारल्यामुळे जावयाने सासऱ्याला केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
रांजणगाव सांडस : शेलारवाडी (ता. शिरूर) येथे कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सासरे बंडू बापुराव हतागळे (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. वडगाव रासाई, मूळ रा. मंगरूळ, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिरूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि २२ जुलै) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बंडू हतागळे यांच्या घरी त्यांचा जावई सचिन नारायण घोरपडे, नारायण सीताराम घोरपडे, राजाभाऊ रघुनाथ खंडागळे आणि इतर एक जण आले. घरात कौटुंबिक चर्चा सुरू असताना सासऱ्याने जावयाला, “तू माझ्या मुलीला का मारहाण करतोस?” असा जाब विचारला. यावरून सचिन घोरपडे याचा राग अनावर झाला. त्याने पत्नीच्या केसांना पकडून तिला जमिनीवर जोरात आपटले. हे पाहून बंडू हतागळे यांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली असता नारायण घोरपडे याने त्यांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. तसेच इतर आरोपींनी मिळून त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि “तू माझ्या मुलाला का अडवतोस, तुला जिवे मारून टाकीन”, अशी धमकी दिली.
या घटनेनंतर शिरूर पोलिस ठाण्यात सचिन नारायण घोरपडे, नारायण सीताराम घोरपडे आणि राजाभाऊ रघुनाथ खंडागळे (सर्व रा. करंदी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.