पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 20:37 IST2025-10-15T20:33:46+5:302025-10-15T20:37:00+5:30
पॅनक्लब रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘आम्ही पोलिस आहोत.

पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने लंपास
पुणे : पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडील दोन लाख ९० हजारांची सोनसाखळी लांबवल्याची घटना बाणेर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे बाणेर भागातील सोसायटीत राहायला आहेत. मंगळवारी (दि. १४) सकाळी सातच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे घरातून फिरायला निघाले. पॅनक्लब रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘आम्ही पोलिस आहोत. या भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांना पकडण्यासाठी आम्ही गस्त घालत आहोत’, अशी बतावणी चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवले. त्यांच्याकडील दोन लाख ९० हजार रुपयांची सोनसाखळी काढून ठेवण्यास सांगितले.
सोनसाखळी कागदात गुंडाळून ठेवा असे सांगत चोरट्यांनी सोनसाखळी लांबवली. यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. सोनसाखळी चोरल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.